

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जॅकेटवर स्टिकर्स लावण्याबाबत सभागृहाच्या नियमांचा हवाला देत काँग्रेसच्या खासदारांना धडा दिला. काँग्रेस खासदारांच्या जॅकेटवरील स्टिकर्सवर त्यांनी आक्षेप घेतला.
ते म्हणाले की, कोणत्याही सदस्याला राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त कोणतेही स्टिकर घालून सभागृहात प्रवेश करता येणार नाही. गुरूवारी काँग्रेसचे खासदार काळे जॅकेट घालून सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले होते. या जॅकेटवर ‘मोदी अदानी एक है’ असे लिहिलेले स्टिकर होते. हे स्टिकर पाहून लोकसभा अध्यक्ष संतापले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले की, कोणत्याही सदस्याने अशा प्रकारचे स्टिकर लावून सभागृहात येऊ नये. राष्ट्रध्वजाशिवाय कोणत्याही सदस्याला कोणतेही स्टिकर लावून सभागृहात प्रवेश करता येणार नाही. हा नियम सर्वांना लागू असल्याचेही लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा, कोणालाही असे स्टिकर लावून येण्याची परवानगी नाही, असेही अध्यक्ष म्हणाले.
तत्पूर्वी, काँग्रेस खासदारांनी अदानी समूहाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी करत संसद भवन परिसरात अनोख्या पद्धतीने निदर्शने केली. काँग्रेस खासदाराने काळे जॅकेट घातले होते. ज्यावर 'मोदी अदानी एक है' असे लिहिले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निषेध मोर्चाही काढला.