Jharkhand Lightning Tragedy | झारखंडमध्ये वीज कोसळून १४ ठार

देशात मुसळधार पावसाचा कहर; यूपीत गंगा नदीचे पाणी महामार्गावर
Jharkhand Lightning Tragedy |
Jharkhand Lightning Tragedy | झारखंडमध्ये वीज कोसळून १४ ठारFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी पाऊस आता जीवघेणा ठरत आहे. झारखंडमध्ये मंगळवारी वीज कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत. यामध्ये गिरिडीह जिल्ह्यात सर्वाधिक ९, दुमका येथे ३ आणि लातेहार येथे २ जणांचा मृत्यू झाला.

बिजनौरमध्ये गंगा नदी महामार्गावर

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीचे पाणी थेट महामार्गावर आले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे महामार्गाचा जोडरस्ता वाहून गेला. रस्त्यावर सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला आहे. फरुखाबादमध्येही महामार्गावर बॅरिकेडिंग करून वाहतूक बंद केली आहे. ४० हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. मिर्झापूरमध्ये दोन मुलांचा खड्ड्यात बुडून, तर २५ वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला.

हिमाचल आणि उत्तराखंडात ३०० पेक्षा जास्त रस्ते बंद

हिमाचल प्रदेशमध्ये १६० पेक्षा जास्त रस्ते बंद झाले आहेत. चंदीगड-मनाली फोरलेन महामार्गावर भूस्खलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. उत्तराखंडमध्ये १०० हून अधिक रस्ते बंद आहेत. उत्तरकाशी येथील यमुनोत्री महामार्गावर स्यानाचट्टी आणि सिलाई बँड परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. डेेहराडून आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये बारावीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. बिहार आणि झारखंडमध्ये वीज कोसळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडण्यामागे बंगालच्या उपसागरातून येणारी दमट हवा आणि जमिनीवरील उष्णता हे प्रमुख कारण असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात.

आसाममध्ये पूरस्थिती कायम

आसाममध्ये अजूनही २३ भाग पूरग्रस्त आहेत. आतापर्यंत पूर आणि संबंधित घटनांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला असून, काही नागरिक बेपत्ता आहेत. शिवसागर जिल्ह्यातील नजीरा परिसरात पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

केरळम्‌मध्ये १८ हजारांवर नागरिक मदत छावण्यांमध्ये

केरळम्‌मध्ये १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून, ४ जण बेपत्ता आहेत. पूर आणि अतिवृष्टीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्य सरकारच्या माहितीनुसार, १८ हजारांहून अधिक नागरिकांना मदत छावण्यांमध्ये ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news