

Siddharth Shinde Death
प्रशांत वाघाये
नवी दिल्ली : दिल्लीत मराठी पत्रकारांसाठी महाराष्ट्र सदन ही अनेक अर्थांनी महत्त्वाची वास्तू आहे. त्यामुळे पत्रकारांची इथे नेहमीच ये जा असते. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात वनतारा प्रकरण आणि वक्फ प्रकरणावर सुनावणी होती. त्या सुनावणीच्या वार्तांकनासाठी सदनातूनच इतर पत्रकार सहकाऱ्यांच्या समवेत न्यायालय परिसरात गेलो होतो. सुनावणी झाल्यानंतर ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली, त्यावर थोडी चर्चाही केली आणि पुन्हा महाराष्ट्र सदनात परतलो.
तिथे तासभर थांबल्यानंतर मी दुसऱ्या एका कामासाठी एका मंत्रालयात जायला निघत होतो, इतक्यात आमचे एक पत्रकार सहकारी प्रमोद जगताप यांना फोन आला की, सिद्धार्थ शिंदे यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. संबंधित कार्यालय सर्वोच्च न्यायालयाच्या जवळच होते त्यामुळे पुढच्या काही मिनिटात प्रमोद जगताप, उर्वशी खोना आणि मी असे तिघे पत्रकार तिकडे पोहोचलो. दरम्यान, तिथे रुग्णवाहिका बोलावली होती. त्याद्वारे त्यांना तातडीने एम्समध्ये नेऊन दाखल केले. आमचे एक डॉक्टर मित्र अजित थोरात हेही तिकडे पोहोचले. तातडीने उपचार सुरू करण्यात आले. काही वेळात शिंदे कुटुंबीय आणि मित्र तसेच काही पत्रकारही दाखल झाले. काही तास उपचारही झाले मात्र त्यांची प्राणज्योत मालावली. दरम्यानच्या त्या काही तासांमध्ये पत्रकार सहकारी उर्वशी खोना यांनी श्रीमती शिंदे यांना खूप धैर्याने सांभाळले. सिद्धार्थ शिंदे यांचा मुलगा माझ्यासोबत होता. असं वाटत होतं की ते लवकरच बरे होतील मात्र दुर्दैव की ते होऊ शकलं नाही.
सिद्धार्थ शिंदे सर्वोच्च न्यायालयात जवळपास २ दशके प्रॅक्टिस करत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होते. राजकीय वर्तुळातील अनेक कुटुंब त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारापैकी आहेत. प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख त्यांचे शाळेतील मित्र होते. त्यांच्यासोबत लवकरच ते पडद्यावरही दिसणार होते. असे असतानाही ते या गोष्टी कुठेही दर्शवायचे नाही. भारतीय संविधान आणि कायद्याचे त्यांना सखोल ज्ञान होते.
कायद्यासह नवीन तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, हेलिकॉप्टर, नवी पुस्तके, चित्रपट अशा विविध विषयांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे खूप माहिती आणि संदर्भ असायचा. माझ्या मागील ३ वर्षाच्या दिल्लीच्या अनुभवात त्यांच्याशी अनेक वेळा या सगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. अनेक वेळा 'पुढारी'च्या बातम्यांसाठी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, विशेष म्हणजे ते उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया द्यायचे. मुद्दा क्लिष्ट असेल तर अशा पद्धतीने लिही म्हणजे वाचकांना समजेल, असेही अगदी हक्काने सांगायचे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्यांच्या प्रतिक्रियेसह बातमी यायची तेव्हा अनेक लोक त्यांना ती बातमी पाठवायचे. तीच बातमी सिद्धार्थ शिंदे मलाही कौतुकाने पाठवायचे. शारीरिक - मानसिक तंदुरुस्ती बद्दलही ते जागरूक होते. जमेल तसा व्यायाम करायचे आणि सायकलिंग देखील करायचे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षापासून ते आरक्षण अशा अनेक प्रकरणांवर कायदेशीर बाबींची मांडणी सोप्या आणि स्पष्ट भाषेत करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांचे पत्रकार यांनाही ते न्यायालयात काय घडले, हे तपशीलवार आणि समजेल अशा भाषेत सांगायचे. न्यायालयीन घडामोडींमध्ये बातमी नक्की काय आहे, हेही त्यांना चांगलं कळत असे. त्यांच्या स्वभातही जादू होती. एकदा भेटलेली व्यक्ती त्यांना विसरू शकणार नाही अशा लाघवी स्वभावाचे ते धनी होते. त्यामुळेच कदाचित कायदा, माध्यम या क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात त्यांचा मित्र परिवारही महाराष्ट्र, देशात आणि जगभरात विस्तारला आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची असलेली कुठली सुनावणी कधी आहे, त्यासंदर्भातील तारीख, प्रकरण क्रमांक, यापूर्वी त्या प्रकरणात काय झाले होते, असा तपशील ते नित्यनेमाने आम्हा पत्रकारांना पाठवायचे. मी अनेक वेळा ज्येष्ठ पत्रकार अजय बुवा, उमेश कुमार यांना म्हणायचो की अशी सेवा आपल्याला पत्रकार मिळणे दुर्मिळच. कधी बाहेरगावी कामानिमित्त किंवा कुटुंबासह फिरायला गेले तर तेही सांगायचे की मी एवढे दिवस दिल्लीत उपलब्ध नाही. मला आठवते एकदा ते लंडनला होते आणि कुठल्यातरी महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी होती. आम्ही खुपदा फोन केले मात्र फोन लागत नव्हता. सुनावणी आहे हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲपला त्याविषयी एक प्रतिक्रिया पाठवली आणि व्हिडिओ पाठवला. मी लंडनमध्ये आहे त्यामुळे खूपच महत्वाचे असेल तर व्हॉट्सॲपवर संपर्क करा, असेही आवर्जून सांगितले. त्यांनी आम्हाला माहिती देणे हे त्यांचे काम नव्हते. मात्र मराठी पत्रकार म्हणून असलेले स्नेहबंध जोपासत आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून ते हे करायचे.
महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणावर बोलायला त्यांना आवडत असे. बोलण्यासाठी त्या संदर्भातील चांगली माहिती त्यांच्याकडे होती. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या राजकीय घडामोडींवर ते व्यक्त व्हायचे. त्यांनी विदेशातून कायद्याचे उच्चशिक्षण शिक्षण घेतले होते. अनेक वेळा टीव्हीवर बोलताना लोक त्यांना बघायचे, त्यांनी लिहिलेले लेख, त्यांनी केलेले विश्लेषण वाचायचे. अनेक गुणांमुळे त्यांची राज्यात महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक वेळा महाराष्ट्र सदन परिसरात किंवा मराठी कार्यक्रम राहायचे तिकडे महाराष्ट्रातून आलेले लोक फोटो काढण्यासाठी विचारायचे. अगदी आपुलकीने त्यांची चौकशी करत ते कुठून आले, कोणत्या कामासाठी दिल्लीत आले असे विचारून काही मदत लागली तर सांगा, असेही मनापासून म्हणायचे. समोरच्यासाठी असलेली आपुलकी पहिल्या भेटीतच जाणवायची.
का? कोण जाणे? वयाने वडील असले तरी माझी आणि त्यांची बऱ्याच मुद्द्यांवर चांगली चर्चा होत असे. त्यांचे आजोबा अण्णासाहेब शिंदे आणि अनेक दिग्गज नेत्यांसोबत त्यांच्या असलेल्या आठवणी त्यांनी आवर्जून सांगताना ते रमायचे. जेवढ्या विषयांवर आम्ही चर्चा केली असेल तेवढ्या विषयांवरील चर्चेचे एक संकलन होऊ शकेल. रविवारी सकाळी आमचं बोलणं झालं. त्यात शनिवार कसा गेला यावर आम्ही चर्चा केली. मुलगी तर शिकायला बाहेर आहे. मुलाची परीक्षा संपली तर त्याला थोडं फिरायला घेऊन गेलो होतो, असे सांगत सोमवारी न्यायालय परिसरात भेटू असे ठरले... त्यांचा माझा हा फोन शेवटचा ठरला. सिद्धार्थ शिंदे यांचे असे अकाली जाणे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाचेही मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याचे कधीही न भरून निघणारी हानी झाली.