

दरभंगा; वृत्तसंस्था : 1962 च्या भारत-चीन युद्धात भारताला 600 किलो सोने दान करणार्या, तसेच खासगी जेट विमानेही वापरायला देणार्या प्रखर देशभक्त राणी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. बिहारच्या दरभंगा येथील ऐतिहासिक कल्याणी निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ दरभंगा राजघराण्यातीलच नव्हे, तर मिथिलांचल प्रदेशातील एका प्रतिष्ठित अध्यायाचा अंत झाला. सेवा, त्याग आणि प्रखर देशभक्तीमुळे त्यांनी सर्वसामान्यांमध्ये आदराचे स्थान मिळविले होते.
दरभंगा राजघराण्याला राष्ट्रीय इतिहासात एक अद्वितीय स्थान आहे. विशेषतः, 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांनी राष्ट्रासाठी असाधारण योगदान दिले आहे. देशावर कोसळलेल्या या संकटावेळी जेव्हा भारत सरकारने नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले, तेव्हा दरभंगा राजघराण्याने सर्वप्रथम प्रतिसाद दिला. या कुटुंबाने दरभंगा येथील इंद्रभवन मैदानावर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय संरक्षणासाठी 15 मण (अंदाजे 600 किलो) सोने दान केले होते. तेव्हापासून हे दानकृत्य लोककथांचा भाग झाले होते.
राणी कामसुंदरी देवी यांनी आयुष्यात विशेषाधिकारापेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने दरभंगा आणि मिथिलांचलमध्ये शोककळा पसरली. दरभंगा राजघराण्याच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांच्यावर संपूर्ण पारंपरिक सन्मानान अंत्यसंस्कार करण्यात आले.