

पुढारी ऑनलाईन : जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आज (दि.१९) सक्तवसुली संचालनालय (ईडी ) कार्यालयात हजर झाले. या प्रकरणी मंगळवारी( दि.१८) ईडीने लालू प्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मुलगी मीसा भारती आणि मुलगा तेज प्रताप यादव यांची सुमारे चार तास चौकशी झाली होती. (Land For Jobs scam)
जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी 'ईडी'ने लालूप्रसाद यादव यांना समन्स बजावले होते. त्यांना आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. लालू प्रसाद यादव नियोजित वेळेच्या सात मिनिटे आधी 'ईडी' कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत राजद खासदार आणि त्यांची मुलगी मीसा भारती आहेत. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर राजद कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. त्यांनी केंद्र सरकारविरोधात जाेरदार घोषणाबाजी केली. लालू प्रसादांच्या चौकशीबाबत राजदचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, "हे निवडणूक समन्स आहे. या सगळ्यामुळे काही फरक पडत नाही. लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब घाबरणार नाही. निवडणुकीच्या काळात भाजप अशा युक्त्या अवलंबत राहतो."
माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर नोकरीच्या बदल्यात लोकांकडून जमीन घेतल्याचा किंवा त्यांच्या कुटुंबियांवर कमी किमतीत जमीन विकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. २००४ ते २००९ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा घोटाळा झाला. रेल्वेमंत्री असताना लालू यादव यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भरती केल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आतापर्यंत अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. २० जानेवारी २०२४ रोजी दिल्ली आणि पाटणा पथकातील ईडी अधिकाऱ्यांनी लालूप्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची १० तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. या काळात लालू प्रसाद यादव यांना ५० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी या प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही, अशा स्वरुपात दिली होती.