Amit Shah | लालूंचा पुत्र अपहरण खाते सुरू करेल; अमित शहा याचा टोला
पाटणा; वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी बिहारमधील मतदारांना इशारा दिला की, विरोधी महाआघाडी सत्तेत आली, तर ती अपहरण विभाग सुरू करेल.
जमुई येथील एका सभेत बोलताना शहा यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व त्यांचे पुत्र, महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही जिंकलो तर बिहारला पूरमुक्त करण्यासाठी एक नवीन विभाग तयार करू. पण लालूंचा मुलगा जिंकला, तर तो अपहरण विभाग सुरू करेल. आम्ही जंगलराज परत येऊ देणार नाही.
जर तुम्ही थोडी जरी चूक केली आणि कमळ किंवा बाण या चिन्हांपासून थोडे जरी विचलित झालात, तर पुन्हा एकदा जंगलराज परत येईल. जमुईला जंगलराज हवे आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल पक्षाच्या निवडणूक चिन्हांचा संदर्भ दिला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या आणि अंतिम टप्प्यात 11 नोव्हेंबर रोजी जमुईमध्ये मतदान होणार असून, येथे चार विधानसभा मतदारसंघ आहेत.
पहिल्या टप्प्यात महाआघाडीचा सफाया
गुरुवारी बिहारच्या 243 पैकी 121 मतदारसंघांत झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा संदर्भ देत भाजपचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे मुख्य रणनीतिकार असलेल्या शहा यांनी दावा केला की, महाआघाडीचा सफाया झाला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात प्राथमिक अंदाजानुसार 64.46 टक्के मतदान झाले, जे राज्यासाठी एक नवीन उच्चांक आहे. दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

