

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना जगातील एका सुप्रसिद्ध विद्यापीठाने त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देण्यासाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान, बिहारच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यात त्यावरून कलगीतुरा रंगला आहे. सध्या बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि भाजपची सत्ता आहे. (Lalu Prasad Yadav Harvard University invitation)
लालुप्रसाद यादव हे माजी रेल्वेमंत्री आहेत. त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने व्याख्यानासाठी निमंत्रित केले आहे. लालुंनी भारतीय रेल्वेची स्थिती कशी बदललली याविषयी हे व्याख्यान असणार आहे. (Lalu Prasad Yadav Harvard University invitation)
दरम्यान, सध्या लालू प्रसाद यादव हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे जेडीयूचे राज्यसभेतील खासदार संजयकुमार झा यांनी लालुंना विरोध दर्शविला आहे. राज्यसभेतील चर्चेवेळी खासदार संजयकुमार झा म्हणाले, रेल्वेची स्थिती लालू रेल्वेमंत्री असताना नव्हे तर जेडीयू पक्षप्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे रेल्वेमंत्री असतानाच्या काळापासून बदलली, असे सांगितले. सध्याच्या सरकारने रेल्वे बजेटमध्ये बिहारला सुमारे १० हजार कोटीं रूपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.
लालुंचे नाव न घेता खासदार संजयकुमार झा म्हणाले, हार्वर्ड विद्यापीठाने लालुंना निमंत्रित का केले? हा मोठा प्रश्न आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी तसेच आयआरसीटीसी घोटाळ्यात ते जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान, राजदचे खा. मनोजकुमार झा यांनी या विधानाला आक्षेप घेत हे शब्द रेकॉर्डमधून वगळण्याची मागणी केली. दरम्यान, सभापती राजीव शुक्ला यांनी देखील सभागृहात नसलेल्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करू नये, असे स्पष्ट केले. सभागृहातील इतर सदस्यांनी रेल्वे अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने सूचना केल्या.
दरम्यान, यावेळी चर्चेच कुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वेस्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत्यूसाठी एक महिन्यानंतरही अद्यापही कुणालाही जबाबदार धरले गेले नसल्याचे आम आदमी पक्षाच्या अशोककुमार मित्तल यांनी निदर्शनास आणून दिले.