

लेह (लडाख) : लडाखची ओळख उंच पर्वत, विस्तीर्ण बर्फाच्छादित भूभाग आणि खोल दऱ्यांसाठी आहे. ड्रॅगन (चीन) या भागावर डोळा ठेवून असतो, म्हणूनही लडाखची ओळख आहे. आता लडाखची नवी ओळख देशात, जगात निर्माण होणार आहे. देशातील पहिला भू- औष्णिक ऊर्जा प्रकल्प अशी लडाखची ही नवी ओळख असेल. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा (ओएनजीसी) हा पायलट प्रोजेक्ट असून, तो यशस्वी ठरला तर महाराष्ट्रातील जळगावसह देशात असे ३४० प्रकल्प सुरू होतील.
समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचीवर आणि जमिनीपासून एक हजार फूट खाली असलेली २०० अंश सेल्सिअस उष्णता पाण्याच्या (बाष्प) रूपात काढली जाईल आणि त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. अर्थातच, या उष्ण पाण्यासाठी जमिनीत एक हजार फूट ड्रिल केले जाणार आहे. ड्रिलिंगचे काम ३० जुलैपासून सुरू होणार आहे. एक हजार फूट खोदण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल. नंतर प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होईल; मग भू-औष्णिक संयंत्र उभारले जाईल. हे कामही १० दिवसांत पूर्ण होईल. यामुळे लडाखच्या पर्यावरणाची हानी होणार नाही, हे विशेष! ५ चौरस कि.मी. परिसरात हा भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
खनिजांच्या किरणोत्सर्गी विघटनाने जमिनीत उष्णता निर्माण होते. ही उष्णता भूगर्भातील पाणी गरम करते. ही वाफ टर्बाईन चालवते आणि वीज निर्माण करते.
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने देशाच्या भूगर्भातील सुमारे ३४० गरम पाण्याच्या स्रोतांची यादी तयार केली आहे. लडाखमधील पुगा खोरे हे यातले पहिलेच ठिकाण होय. पुगातील प्रकल्प यशस्वी झाला, तर महाराष्ट्रातील जळगाव, उत्तराखंडमधील तपोवन, हिमाचलमधील मणिकरण आणि छत्तीसगडमधील तट्टापानी येथील उष्ण पाण्याच्या झऱ्यांतून वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू केले जातील.
एक मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट सुरुवातीसाठी असेल. नंतरच्या काळात ते वाढवून पुगा खोरे व आसपासच्या ११० गावांना ही वीज विनामूल्य दिली जाईल.