

Kushinagar Madarsa controversy
कुशीनगर : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील एका मदरशामध्ये बसवण्यात आलेला छताचा पंखा दुरुस्तीसाठी देण्यात आला होता. हा एक साधा पांढरा पंखा होता, मात्र त्याच्या मोटर हाऊसिंगवर असलेल्या एका लेबलमुळे आणि कोरीव कामामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. तीन दिवसांपूर्वी या पंख्याचा फोटो व्हायरल झाला, ज्यावर 'मेड इन पाकिस्तान' असे लेबल होते.सीमेपलीकडील हे उत्पादन एका धार्मिक संस्थेत कसे आले, याची पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंखा दुरुस्त करणाऱ्या इलेक्ट्रिशियनने पंख्याच्या वरच्या भागावरील ते लेबल पाहिले. त्याचा फोटो त्याने घेतला. तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कुशीनगरचे पोलीस अधिकारी जयंत यादव यांनी सांगितले की, पोलिसांनी मदरशाचे व्यवस्थापक युनूस अन्सारी यांची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की हा पंखा एका स्थानिक रहिवाशाने मदरशाला दान केला होता.
पोलिसांनी पुढे तपास केला असता संबंधित रहिवाशाने सांगितले की, त्याला हा पंखा त्याच्या मुलाने दिला होता. तो सौदी अरेबियात स्थायिक आहे. हा पंखा २०२३ मध्ये मदरशाला दान करण्यात आला होता.मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याने २०२० मध्ये सौदी अरेबियातून हा पंखा विकत घेतला होता आणि आपल्या वडिलांना पाठवला होता. त्या मुलाने पंख्याच्या खरेदीची पावती पोलिसांना शेअर केली आहे. आम्ही सध्या कागदपत्रांची तपासणी करत आहोत आणि आवश्यक सीमा शुल्क (Customs Duty) भरले होते का, याची पडताळणी करत आहोत," असे सीओ यादव यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, ही बाब केवळ योगायोग आहे की यात काही 'मोठे षडयंत्र' आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, मदरशाचे शिक्षक मेराजुद्दीन अन्सारी यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सांगितले की, पंखा नीट चालत नव्हता. त्यामळे तो दुरुस्तीसाठी पाठवला होता. "त्यावर 'मेड इन पाकिस्तान' असे लिहिले आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. प्रशासन आणि पोलिसांनी चौकशी केली असून त्यात काहीही संशयास्पद आढळलेले नाही.
मदरसा १९९४ पासून लोकवर्गणीतून चालवला जातो. पूर्वी येथे अनेक शिक्षक आणि विद्यार्थी होते, परंतु निधीच्या अभावामुळे अनेकांनी मदरसा सोडला. सध्या ५० विद्यार्थ्यांसाठी ते एकमेव शिक्षक मेराजुद्दीन अन्सारी कार्यरत आहेत.