

नवी दिल्ली : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंबद्दल यांच्याबद्दल एक गाणं गायलं. त्याचे पडसाद राजधानी दिल्लीत आणि संसदेच्या अधिवेशनातही उमटले. या प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्य सरकारवर टीका केली तर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी या वक्तव्याला चुकीचे असल्याचे म्हटले. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलू नये, असेही सत्ताधारी खासदार म्हणाले.
कुठल्याही नेत्याबद्दल, राजकीय पक्षाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे ही चांगली गोष्ट नाही. यातून चुकीचा संदेश जातो. व्यक्त होण्याचा अधिकार आहे याचा अर्थ कुठेही, काहीही बोलावे असा होत नाही.
रक्षा खडसे, केंद्रीय मंत्री
शिवसेना शिंदे गटाचे नेतेही लोकांविरोधात, राजकीय पक्षांविरुद्ध वेगवेगळी वक्तव्य करतात. मात्र कुणाल कामराच्या वक्तव्यानंतर जे घडत आहे ते म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. जे आपल्या मूळ पक्षासोबत राहू शकले नाहीत, ज्यांनी आपल्या मूळ पक्षाला धोका दिला त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो?
जया बच्चन, खासदार
कुणाल कामरा जिथे बोलला तो एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. त्यात व्यंग आहे, उपरोधित टोला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. राजकारणात नेतेही वेगवेगळी वक्तव्य करत होते. मात्र अशा वक्तव्यामुळे समाजात असंतुलन कधी दिसले नव्हते. मात्र आज महाराष्ट्रात जे दिसत आहे ते समाजासाठी एक वेगळा संदेश देत आहे. सगळ्या गोष्टींचा प्रभाव येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये दिसणार आहे. महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा सरकार नको त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे.
प्रणिती शिंदे, काँग्रेस खासदार