ब्रेकिंग! कोलकात्यातील आरजी कार बलात्कार-खून प्रकरणी दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

Kolkata RG Kar Doctor Case | सियालदह न्यायालयाचा निर्णय
Kolkata RG Kar Doctor Case Court Verdict
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. (Image soure- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील (Kolkata RG Kar Doctor Case) दोषी संजय रॉय याला आज सोमवारी (दि.२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला शनिवारी (दि.१८) दोषी ठरवले होते. त्याला आज सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) संजय रॉय याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तसेच पीडितेच्या पालकांच्या वकिलांनीदेखील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यास नकार देत हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून वर्गीकृत केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यावेळी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.

मी काहीही केलेले नाही- दोषी कोर्टात काय म्हणाला?

न्यायालयाने शिक्षा सुनावण्यापूर्वी दोषी रॉयने आपण निर्दोष असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. "मी काहीही केलेले नाही. बलात्कार अथवा खूनही केलेला नाही. मला या गुन्ह्यात विनाकारण अडकवण्यात आले आहे. मी निष्पाप आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले होते की माझा छळ करण्यात आला. त्यांना जे हवे होते त्यासाठी मला स्वाक्षरी करायला लावली," असे रॉयने न्यायालयात सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला शिक्षा सुनावली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी कोलकातामधील संपूर्ण सियालदाह न्यायालय परिसरात कडक पौलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषी संजय रॉय याला न्यायालयात आणणण्यात आले.

या खटल्याच्या ५७ दिवसांनंतर सियालदह अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयाने निकाल दिला. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेवरुन देशभर डॉक्टरांनी निर्देशने करुन संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक केली होती.

"या खटल्यातील मी सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले. युक्तिवादही ऐकले. हे सर्व पाहिल्यावर, मी तुला दोषी ठरवत आहे. तू दोषी आहेस. तुला शिक्षा झालीच पाहिजे," असे न्यायाधीश न्यायाधीश अनिर्बान दास यांनी म्हटले होते. दरम्यान, नराधम संजय रॉयने न्यायाधीशांसमोर आपण गुन्हा केला नसल्याचा दावा केला. आरोपी संजय रॉयने न्यायाधीशांसमोर म्हटले की, "मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. मी असा गुन्हा केलेला नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सोडून दिले जात आहे. एका आयपीएसचा यात सहभाग आहे."

या प्रकरणातील दोषी संजय रॉयवर कलम ६४ (बलात्कार), कलम ६६ (मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिक्षा) आणि कलम १०३ (खून) अंतर्गत आरोप ठेवण्यात आला आहे.

Kolkata RG Kar Doctor Case | घटनाक्रम

९ ऑगस्ट २०२४ : रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये एका ३१ वर्षीय ज्युनिअर डॉक्टरचा मृतदेह सापडला. तिला बाह्य १६, तर अंतर्गत नऊ जखमा झाल्या होत्या. बलात्कारानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

१० ऑगस्ट २०२४ : वाहतूक पोलिस स्वयंसेवक असणार्‍या संजय रॉयला अटक. वैद्यकीय कर्मचार्‍यांची आक्रमक मोहीम.

१२ ऑगस्ट २०२४ : हॉस्पिटलचे प्रमुख संदीप घोष बडतर्फ. डॉक्टरांचा देशव्यापी संप.

१३ ऑगस्ट २०२४ : पीडितेचे कुटुंबीय आणि अन्य काहीजणांची कोलकाता उच्च न्यायालयात धाव.

१४ ऑगस्ट २०२४ : संजय रॉय कोलकाता पोलिसांकडून सीबीआयच्या ताब्यात.

१५ ऑगस्ट २०२४ : देशभर रात्री मेणबत्ती मोर्चे काढत महिलांच्या सुरक्षिततेची मागणी.

१७ ऑगस्ट २०२४ : आयएएमचा देशव्यापी डॉक्टरांचा संप.

२० ऑगस्ट २०२४ : सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:हून प्रकरणाची दखल. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसाठी १० सदस्यीय टास्क फोर्स स्थापन.

२८ ऑगस्ट २०२४ : पोलिसांचे संदीप घोषसह रुग्णालयाशी संबंधितांच्या निवासस्थानावर छापे. सप्टेंबरच्या मध्यात घोषला पुराव्यात छेडछाड केल्याच्या आरोपावरून अटक. एफआयआर नोंदवण्यात उशीर केल्याबद्दल ताला पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली.

१८ जानेवारी २०२५ : न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले.

१९ जानेवारी २०२५ : संजय रॉयला शिक्षा सुनावण्यात आली.

Kolkata RG Kar Doctor Case Court Verdict
राहुल गांधींना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यातील कार्यवाहीला स्थगिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news