पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता निवासी महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणी निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. आरोग्य सचिवांनी राजीनामा द्यावा. आमच्या सर्व मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर पुन्हा एकदा चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत यांना ईमेलच्या माध्यमातून केली आहे. ( rg kar case)
मागील ४० दिवसांपासून आंदोलन करत असणार्या कोलकातामधील निवासी डॉक्टरांनी पोलिस आयुक्त आणि आरोग्य सचिवांना पदावरुन हटवण्याबरोबरच पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी निवासी डॉक्टर आणि ममता यांच्यात बैठक झाली. यामध्ये ममता यांनी डॉक्टरांच्या ५ पैकी ३ मागण्या मान्य केल्या. मंगळवार, १७ सप्टेंबरला त्यांनी पोलिस आयुक्त विनीत गोयल यांना पदावरून हटवले होते. त्यांच्या जागी मनोज वर्मा यांना आयुक्त करण्यात आले आहे. यानंतरमंगळवारी रात्री उशिरा निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
आज निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केले की, आमचा अर्धा विजय झाला आहे. आरोग्य सचिव एनएस निगम यांचा राजीनामा आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांकडे दुसरी बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टरांच्या नियामक मंडळाची बैठक सुरू झाली, ती पहाटे एक वाजेपर्यंत सुरू होती. ज्युनिअर डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. आम्हाला सरकारशी पुन्हा चर्चा करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोलकात्याच्या सियालदह न्यायालयाने आरजी कार कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा पोलीस ठाण्याचे एसएचओ अभिजित मंडल यांच्या सीबीआय कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, घोष आणि मंडल यांच्याकडून कॉल रेकॉर्डिंग, डीव्हीआर, सीसीटीव्ही आणि घटनेशी संबंधित इतर डेटाचा तपास केला जात आहे.