पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. निवासी डॉक्टर पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा, या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. दरम्यान, आरजी कारच्या प्राचार्य कार्यालयाजवळ पीडित डॉक्टरचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कृतीचे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी समर्थन केले आहे. तर तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनीही या कृतीवर टीका केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलकातामधील पीडित महिला डॉक्टरच्या पुतळ्याला 'क्राय ऑफ द अवर' असे नाव देण्यात आले आहे. कलाकार असित सैन यांनी सांगितले की, या पुतळ्यामध्ये पीडितेच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांची वेदना आणि भीषणता दाखवण्यात आली आहे. प्रतिकात्मक पुतळ्यात एक महिला रडताना दाखवली आहे. आरजी कारच्या प्राचार्य कार्यालयाजवळ हा पुतळा बसवण्यात आला आहे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, 'हा पीडितेचा पुतळा नसून, तिने तिच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणाला ज्या वेदना आणि भीषणतेतून अनुभवल्या त्याचे हे प्रतीक आहे. त्याचबरोबर आमच्या निषेधाचेही प्रतीक आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा पुतळा बसवल्याबद्दल डॉक्टरांवर टीका केली. ते म्हणाले की, "डॉक्टरांची कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांविरोधात आहे. न्यायालयाने पीडितेचे नाव आणि ओळख उघड करण्यास मनाई आहे. कलेच्या नावाखाली कोणतीही जबाबदार व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करू शकत नाही. निदर्शने व न्याय मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. वेदनांनी ग्रासलेल्या मुलीचा चेहरा असलेला पुतळा योग्य नाही."
आरजी कार हॉस्पिटलचे डॉ. देबदत्त म्हणाले, "आम्ही कोणतेही नियम मोडलेले नाहीत किंवा न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले नाही. हा फक्त एक प्रतिकात्मक पुतळा आहे. आम्ही त्याचे चित्रण करू इच्छित नाही. पीडितेला किती भीषण वेदनांना सामोरे जावे लागले. तिला कोणता त्रास सहन करावे लागला, हे आम्ही अधिकाऱ्यांना दाखवू इच्छितो. न्यायासाठी आम्ही लढत राहू."