पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रॉय, माजी प्राचार्य संदीप घोष याच्यासह सात जणांची आज (दि.२४ ऑगस्ट) पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर कॉलेजच्या चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्या एका नागरी स्वयंसेवकाचीही व्हॉलेंटियरची पॉलीग्राफ चाचणीही घेतली गेली.
महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची भूमिका संशयास्पद आहे. सीबीआयने त्यांची सलग सहा दिवस चौकशी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआय चौकशीवेळी संदीप घोष यांची विधाने परस्परविरोधी आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही संदीप घोष यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळेच संदीप घोष सीबीआयच्या तपासाच्या रडारवर आहेत. सीबीआयने संदीप घोष, आरोपी संजय रॉय आणि अन्य चार प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि एका सिव्हिल व्हॉलंटियरची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, तो विशेष न्यायालयाने मंजूर केला होता.
न्यायालयाच्या मंजुरीनंतर आज सर्वांची पॉलीग्राफ चाचणी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे संदीप घोष व्यतिरिक्त ज्या चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी केली जात आहे. त्यांनी घटनेच्या रात्री पीडित महिला डॉक्टरबरोबर जेवण केले होते. कारागृहातच आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी घेण्यात येत आहे. उर्वरितांची पॉलीग्राफ चाचणी सीबीआय कार्यालयात घेण्यात येत आहे. पॉलीग्राफ चाचणीसाठी नवी दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधून तज्ज्ञांची टीम कोलकात्यात पोहोचली आहे.
एखाद्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हेगार कबुली देतो; पण त्याच्याकडून गुन्ह्याबाबत सखोल माहिती घेण्यासाठी आणि पुराव्यचवे दुवे जोड्यासाठॅ पॉलीग्राफ चाचणी केली जाते. यासाठी न्यायालयाची मंजुरी लागते. पॉलीग्राफ चाचणीमध्ये गुन्हेगार काही खोटी माहिती देत असेल तर त्याच्या शरीरात काही गोष्टी स्वतःहूनच बदलतात उदा, हृदयाची धडधड वाढते, श्वसनामध्ये बदल होतो, रक्तदाबही वरखाली होतो, हातापायाला घाम सुटतो इत्यादी. पॉलीग्राफ चाचणीला लाय डिटेक्टर चाचणी असेही म्हणतात. या चाचणीत अनेक मानसशास्त्रीय चाचण्या घेतल्या जातात. तपास यंत्रणांनी गुन्हेगाराला विचारलेल्या प्रश्नावेळी त्याचा रक्तदाब, श्वासोच्छवासाची गती, त्वचेची संवेदनशीलता आदी बाबींचा अभ्यास केला जातो.