

थिरुवनंतपुरम; वृत्तसंस्था : केरळने एक ऐतिहासिक टप्पा गाठत स्वतःला देशातील पहिले ‘संपूर्ण डिजिटल साक्षर’ राज्य म्हणून स्थापित केले आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या एका महत्त्वाकांक्षी मोहिमेने चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हे यश मिळवले आहे.
या मोहिमेमुळे राज्यातील 14 ते 65 वयोगटातील 99.98 टक्के नागरिक आता स्मार्टफोन वापरणे, डिजिटल पेमेंट करणे आणि ऑनलाईन शासकीय सेवांचा लाभ घेण्यास सक्षम झाले आहेत. येत्या 21 ऑगस्ट रोजी याची अधिकृत घोषणा होणार असून, या उपक्रमाने लाखो नागरिकांना डिजिटल जगाशी यशस्वीपणे जोडले आहे. ‘डिजी केरळ’ या नावाने राज्यभरात राबवलेल्या या प्रकल्पाने केवळ तंत्रज्ञानाचा प्रसार केला नाही, तर सामान्य नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे.
या मोहिमेची सुरुवात थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील ‘पुल्लमपारा’ या ग्रामपंचायतीपासून झाली, जी देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली होती. या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घेत ‘डिजी केरळ’ मोहिमेची व्याप्ती संपूर्ण राज्यात वाढवली. या कार्यक्रमांतर्गत सुमारे 21.87 लाख केरळवासीयांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे या अभियानाची सुरुवात 65 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आली होती. मात्र, याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांमध्ये 1,500 हून अधिक नवसाक्षर नागरिक हे 90 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, हे या योजनेच्या सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे.
मोहिमेंतर्गत डिजिटल साक्षरतेची व्याख्या निश्चित केली असून यामध्ये स्मार्ट फोनचा प्रभावी वापर करता येणे, इंटरनेटच्या माध्यमातून माहिती शोधणे, शासकीय सेवांसाठी असलेले मोबाईल अॅप्स आणि वेब पोर्टल्स वापरता येणे आणि विविध डिजिटल माध्यमांतून आर्थिक व्यवहार करणे यांचा समावेश आहे.