Kerala High Court
प्रातिनिधिक छायाचित्र.file photo

प्रेम कविता ऐकवत न्‍यायमूर्तींनी ९१ वर्षांच्‍या पतीला मंजूर केला जामीन!

संशयितावर हाेता पत्‍नीवर चाकू हल्‍ला केल्‍याचा आराेप, केरळ हायकोर्टात काय घडलं?
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "वाढत्‍या वयाबरोबर प्रेमाचा प्रकाश मंद होत नाही तर तो अधिक उजळतो. पती आणि पत्‍नीचे नाते जसजसे पुढे जाते तसतसे त्‍यांच्‍यातील प्रेम अधिक दृढ होते. हे नातं प्रेम आणि शांती प्रतिबिंबित करते," अशा काव्‍यमय शब्‍दांमध्‍ये केरळ उच्‍च न्‍यायालयाने ९१ वर्षांच्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकाला जामीन मंजूर केला. मल्याळम कवीच्‍या कवितेमधील ओळी ऐकवत न्‍यायालयाने जोडप्‍याला आनंदाने आणि प्रेमाने राहा, असा सल्‍लाही दिला. यानिमित्त न्‍यायालयासारख्‍या गंभीर आणि वस्‍तुनिष्‍ठ शब्‍दांना सरावलेल्‍या भिंतींना प्रेमकवितेच्या ओळी ऐकायला मिळाल्‍या...

काय घडलं होतं?

'बार अँड बेंच'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, केरळमध्ये एका ९१ वर्षीय थेवन यांच्‍यावर ८८ वर्षीय पत्नी कुंजली यांच्‍यावर चाकूने हल्ला केल्‍याचा आरोप होता. थेवन यांच्या म्हणण्यानुसार पत्नी कुंजलीने त्यांच्यावर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे त्यांना अपमानित आणि निराश वाटले. २१ मार्च रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर थेवनने कुंजलीवर चाकूने हल्ला केला आणि ती गंभीर जखमी झाली. थेवन यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. न्‍यायालयाने त्‍यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. जामीनासाठी त्‍यांनी केरळ उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती.

वृद्धापकाळात एकमेव आधार पत्नी

थेवन यांच्‍या याचिकेवर १० एप्रिल रोजी न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांच्‍या एकलपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन म्‍हणाले, "मला या विषयावर अधिक चर्चा करायची नाही. ९१ वर्षीय थेवन यांना त्यांच्या ८८ वर्षीय पत्नी कुंजलीसोबत त्यांच्या वृद्धापकाळात आनंदाने राहू द्या. थेवन यांना हे माहित असले पाहिजे की त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची एकमेव आधार त्यांची ८८ वर्षीय पत्नी कुंजली असेल आणि कुंजली यांनी असाही विचार केला पाहिजे की त्यांची एकमेव आधार ९१ वर्षीय थेवन असतील.

न्‍यायाधीशांनी कवितेद्वारे केला जामीन मंजूर

थेवन आणि कुंजली यांना हे माहित असले पाहिजे की वय प्रेमाचा प्रकाश मंद करत नाही तर तो अधिक उजळवते. ८८ वर्षीय कुंजली अजूनही तिच्या पतीवर प्रेम करते आणि म्हणूनच ती त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवते. पती आणि पत्‍नीचे नाते जसजसे पुढे जाते तसतसे दोघांचे प्रेम अधिक दृढ होते," असे न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच जीवनातील प्रेम आणि शांती प्रतिबिंबित करणारी दिवंगत मल्याळम कवी एनएन कक्कड यांच्या एका कवितेचा उल्लेख करत ९१ वर्षीय थेवन यांना जामीन मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news