

नवी दिल्ली : केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाने केली. यापूर्वी थिरूअनंतपुरम येथे झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी मुख्यमंत्री निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांकडे सोपवले होते. तसा ठराव एकमताने पारित करण्यात आला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी विविध नेत्यांशी चर्चा करून अखेर सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बुधवारी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि केरळमचे निरीक्षक अजय माकन, पक्षाचे सरचिटणीस आणि केरळचे निरीक्षक मुकुल वासनिक, केरळच्या काँग्रेसच्या प्रभारी दीपा दासमुंशी तसेच माध्यम सरचिटणीस जयराम रमेश उपस्थित होते.
केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युडीएफ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये व्ही. डी. सतीशन यांच्यासह संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पक्षाचे वरिष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांची नावे शर्यतीत होती. अखेर पक्षाने व्ही. डी. सतीशन यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. सतीशन यांच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने एका लोकप्रिय नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. आणि दिल्लीतून एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री बनवणे टाळले. असे असले तरी रमेश चेन्नीथला यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण ते देखील राज्यातील ज्येष्ठ, अनुभवी नेते आहेत.
व्ही. डी. सतीशन यांनी विद्यार्थी दशेत असतानाच राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक संघटनांमधून काम करत त्यांनी पक्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २००१ मध्ये ते प्रथमच केरळम विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग सहा वेळा विजय मिळवत आपल्या मजबूत जनाधाराची छाप पाडली. मावळत्या विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत सरकारला अनेक मुद्द्यांवर धारेवर धरले होते. विशेष म्हणजे, दीर्घ राजकीय अनुभव असूनही त्यांनी यापूर्वी कधीही मंत्रीपद भूषवले नव्हते. तरीही संघटन कौशल्य, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्वामुळे ते केरळममधील काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात.
पक्षाने केलेल्या घोषणेनंतर व्ही. डी. सतीशन पक्ष नेतृत्वाचे आभार आणि आनंद व्यक्त करत म्हणाले की, पक्षाने मला केरळचे नेतृत्व करण्यासाठी निवडले आहे. यामागे अनेक घटक आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांवर निर्णय सोपवणारा ठराव मंजूर करण्यात आला कारण काँग्रेस अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांना अनेकांशी चर्चा करावी लागते. अनेक बाबींचा विचार करावा लागतो. के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला हे दोघेही माझे नेते आणि ज्येष्ठ आहेत. मी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहे. केरळम विधानसभेच्या शानदार विजयात त्यांचे मोठे योगदान आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी संघटन सरचिटणीस म्हणून निवडणुकीत खूप मदत केली. रमेश चेन्नीथला प्रचार समितीचे अध्यक्ष होते. ते दीर्घकाळ माझे नेते राहिले आहेत. मी त्यांच्यासोबत काम केले आहे, असेही ते म्हणाले.
व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, पक्षनेतृत्वाने परिस्थिती आणि निर्णय प्रक्रियेबाबत चर्चा केली. त्यांनी मला बोलावून माझे मत विचारले आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याविषयी चर्चा केली. मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आमदारांचे, पक्ष कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. अखेरीस, पक्षाने एक निर्णय घेतला आणि एक निष्ठावान काँग्रेसजन म्हणून आम्ही सर्वजण पक्षाच्या या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असेही ते म्हणाले.