नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात १२ कोटींपेक्षा अधिक किमतीचे शौचालय आहे. २९ लाखांचा टीव्ही आहे त्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे व्हीव्हीआयपी संस्कृतीचे सर्वात मोठे प्रतीक असल्याची टीका भाजपने केली.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना भाटिया म्हणाले की, अरविंद केजरीवाल बोलले होते की ते इतर राजकारण्यांसारखे मोठे बंगले कधीही वापरणार नाहीत. मात्र जेव्हा केजरीवाल दिल्ली सरकारच्या सर्वोच्च पदावर होते, तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची किंमत खूप जास्त होती. यामध्ये १२ कोटी रुपयांच्या टॉयलेट सीटचाही समावेश आहे, असा घणाघात भाटिया यांनी केला.
केजरीवाल यांची २०१३ ची सोशल मीडिया पोस्ट दाखवत भाटिया म्हणाले की, भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अरविंद केजरीवाल जे २०१२ मध्ये राजकारणात आले. त्यांनी दिल्लीच्या तत्कालिन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर निशाणा साधत शीला यांच्या घरात १० वातानुकूलित यंत्रे (एसी) असल्याचे सांगितले. केजरीवाल यांनी शीला दीक्षितांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र दिल्लीतील ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असताना माजी मुख्यमंत्री एवढ्या आरामात कसे जगू शकतात, असा प्रश्न भाटिया यांनी उपस्थित केला.
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिल्यानंतर आणि सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर १२ कोटी रुपयांची टॉयलेट सीट, २९ लाख रुपयांच्या टीव्हीबद्दल बोलत भाटिया यांनी अधिकृत कागदपत्रांचा हवाला दिला. ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे क्षेत्रफळ २१ हजार स्क्वेअर फूट असून त्यात ५० एसी होते. २५९ टन वातानुकूलित संयंत्र आहे. जवळपास २९ लाखांपेक्षा जास्त किमतीचा टीव्ही होता, असेही भाटिया म्हणाले.