

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
राजधानी दिल्लीतील संसद भवनासह सर्व महत्त्वाच्या संस्था ज्या विधानसभा मतदारसंघात येतात तो मतदारसंघ म्हणजे नवी दिल्ली. सध्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या मतदारसंघाचे आमदार आहेत. पुन्हा एकदा आपच्या वतीने ते मैदानात आहेत. तर त्यांच्याविरुद्ध भाजपकडून माजी खासदार प्रवेशसिंह वर्मा आणि काँग्रेसकडून माजी खासदार संदीप दीक्षित मैदानात आहेत. प्रवेश सिंह वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे पुत्र आहेत तर संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. त्यामुळे एक माजी मुख्यमंत्री विरुद्ध दोन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र याही दृष्टीने या लढतीकडे बघितले जाते. सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांना या मतदारसंघात विजय मिळवणे सोपे वाटत होते. मात्र जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतशी समीकरणे बदलत आहेत.
नवी दिल्ली मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान हे अधिकारी, कर्मचारी आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये समाविष्ट असलेले कामगार आहेत. या सगळ्यांच्या सरकार म्हणून वेगळ्या अपेक्षा आहेत. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना दिल्ली जल बोर्ड, दिल्ली परिवहन महामंडळांचे कर्मचारी केजरीवालांवर नाराज असल्याचे दिसते. त्यांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते जे पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे हे कर्मचारी जर नाराज असतील तर त्यांच्या नाराजीचा फटका केजरीवालांना बसू शकतो. दुसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांना केंद्रामध्ये वेगळे सरकार आणि दिल्लीत वेगळे सरकार आले तर दोन सरकारांमध्ये काम करणे अडचणीचे होईल, दोन्ही ठिकाणी सारखी सरकारे असतील तर काम करणे सोयीचे होईल, असे वाटते. याचाही फटका काही प्रमाणात केजरीवालांना बसू शकतो. मात्र केजरीवालांच्या नेतृत्वात दिल्ली सरकारने लागू केलेल्या विविध योजना ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.
संदीप दीक्षितांचा प्रचार कोणात्या पत्थ्यावर?
काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित नवी दिल्लीत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. आतापर्यंत संदीप दीक्षित यांच्यासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याचा सभा झालेल्या नाहीत किंवा त्यांनी त्या घेतल्या नाहीत. मात्र प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संदीप दीक्षित करत आहेत. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत डोअर टू डोअर प्रचारावर संदीप दीक्षित यांचा भर आहे. संदीप दीक्षित यांच्याकडे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचा मोठा वारसा आहे. शिवाय ते दोनदा खासदार राहिले आहेत, त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. प्रचारातही त्यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे.
प्रवेश सिंह वर्मा दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. केजरीवालांना अडकवून ठेवण्यासाठी भाजपने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले. माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र म्हणून लोक त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतात. दिल्ली शहरातून ते दोन वेळा खासदार होते. नवी दिल्ली विधानसभेत त्यांचा आधी फार प्रभाव नसता तरी उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. भाजपनेही त्यांच्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. थोडक्यात सर्वच पक्षांनी या मतदारसंघात पुर्ण ताकद लावली आहे आणि मजबुत उमेदवारही दिले आहेत. आणि म्हणूनच नवी दिल्ली मतदार संघातील ही लढत हायप्रोफाईल आणि लक्षवेधी होत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनाही इथे नक्की कोण विजय मिळवेल याबद्दल अंदाज बांधणे कठीण जात आहे.