

अनिल एस. साक्षी
जम्मू : काश्मीरमधील प्रसिद्ध केशर क्षेत्र पुन्हा गंभीर संकटात आहे. काश्मीरमधील केशरचा टापू म्हणून ओळखला जात असलेल्या पंपोर येथील शेतकरी म्हणतात की, केशर उत्पादकांच्या मते, या वर्षी उत्पादन साधारण 90 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे यंदा केवळ उत्पादन फक्त 10 ते 15 टक्के एवढेच आहे. त्यामुळे हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. जर ताबडतोब उपाययोजना केली नाहीत, तर शतकांपासून काश्मीरची ओळख असलेले हे पीक लुप्त होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
केशर उत्पादक संघ, जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष अब्दुल मजीद वानी म्हणाले, “या वर्षी कंदांमध्ये योग्य प्रकारे अंकुरण झाले नाही. उत्पादन फक्त 15 टक्के इतके आहे. हे मागील वर्षाच्या निम्मेही नाही. सततचा दुष्काळ, प्रभावी सिंचनाची कमतरता आणि गेल्या काही वर्षांत उपलब्ध कंदांची खराब गुणवत्ता ही याची कारणे आहेत. दरवर्षी उत्पादन कमी होत चालले आहे आणि सरकार या क्षेत्राबाबत गंभीर दिसत नाही.” कृषी तज्ज्ञांच्या मते, “कंदांची चुकीची कापणी आणि खराब जमीन व्यवस्थापन पद्धती याला कारणीभूत आहे.”
शेतकर्यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि कृषी मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, तातडीने उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. यामध्ये तत्काळ सिंचन सुविधांची उपलब्धता, केशर शेतांची नियमित पाहणी, कंदांची अवैध विक्री रोखणे आणि नवीन रोपणासाठी उच्च दर्जाचे कंद पुरवठा यांचा समावेश आहे.
आकडेवारीनुसार, काश्मीरमधील केशर शेतीचे क्षेत्र 1996-97 मध्ये 5,707 हेक्टर होते, जे 2019-20 मध्ये फक्त 2,387 हेक्टर झाले आहे, म्हणजे 65% घट. सरकारी आकडेवारीनुसार उत्पादन 2021 मध्ये 17.33 मेट्रिक टन होते, जे 2022 मध्ये 14.87 टन झाले आणि 2023 मध्ये किंचित वाढून 14.94 टन झाले. मात्र, शेतकर्यांचा दावा आहे की, या आकडेवारीत खरी परिस्थिती प्रतिबिंबित होत नाही, मागील वर्षाचे वास्तविक उत्पादन फक्त 20 टक्के इतके होते, आणि यंदा ते याहीपेक्षा कमी अपेक्षित आहे.
पंपोरमध्ये केशर हे केवळ एक पीक नाही तर ते येथील सांस्कृतिक प्रतीक आहे. हजारो कुटुंबांसाठी उपजीविका केशर शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच हे केवळ पीक वाचविण्याबाबत नाही तर पंपोरची परंपरा, संस्कृती आणि ओळख जपण्याबद्दल आहे. जर तातडीने आणि प्रभावी उपाय केले नाहीत, तर 2030 पर्यंत पंपोरमध्ये केशर पूर्णपणे नाहीसे होऊ शकते.