Kashmir cloudburst| काश्मीरमध्ये ढगफुटी; 55 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मचेल माता यात्रेदरम्यान निसर्गाचा कोप
Kashmir cloudburst
काश्मीरमध्ये ढगफुटी; 55 जणांचा मृत्यू
Published on
Updated on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती भागात गुरुवारी झालेल्या भीषण ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आला. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना सध्या सुरू असलेल्या मचेल माता यात्रेच्या मार्गावर घडल्याने आणि यात्रेकरूंची मोठी गर्दी असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. प्रशासनाने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.

केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन

या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहे. एनडीआरएफच्या टीम्स तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे शहा यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.

बचावकार्यात हवामानाचा अडथळा

मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने परिसरातील वाहनतळ (पार्किंग लॉट), लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर) आणि सीआरपीएफचे एक शिबिर पूर्णपणे वाहून गेले. यामुळे अनेकजण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे तुटलेले रस्ते यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर्स घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत आणि रस्तेही वाहून गेले आहेत.

घटनास्थळी परिस्थिती गंभीर : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. दुर्गम भाग असल्याने अचूक माहिती मिळण्यास वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेमुळे परिसरात मोठ्या संख्येने भाविक आणि स्थानिक उपस्थित असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

यात्रा तहकूब

या दुर्घटनेनंतर, 25 जुलैरोजी सुरू झालेली आणि 5 सप्टेंबरपर्यंत चालणारी मचेल माता यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news