

बंगळूर : एड्सबाधित रुग्णसंख्येच्या बाबतीत देशातील तिसर्या क्रमांकाचे राज्य अशी ओळख असलेल्या कर्नाटकात एचआयव्हीचा संसर्ग वेगाने वाढत असून, राज्यात १८ ते २५ वयोगटातील ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक आणि चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. या अहवालानंतर हादरलेल्या राज्य सरकारने ‘राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थे'च्या (एनएसीओ) निर्देशानंतर सर्व महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी व समुपदेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकात सध्या २ लाख ६० हजार एचआयव्हीग्रस्त व्यक्ती आहेत. यापैकी फक्त २ लाख ५ हजार जणांवर उपचार सुरू असून, उर्वरित ५४ हजार एचआयव्हीबाधितांना त्यांच्या एचआयव्ही संसर्गाच्या स्थितीबद्दल (इन्फेक्शन झाले की नाही) माहितीच नाही, अशी अत्यंत गंभीर बाब ‘एनएसीओ’च्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.
‘एनएसीओ’च्या आकडेवारीनुसार, १८ ते ३५ वयोगटातील तरुणांत हा संसर्ग सर्वाधिक वेगाने पसरत आहे. कर्नाटकात या वयोगटातील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या २०२३-२४ मध्ये ४४ हजार ५०० होती. हा आकडा २०२५-२६ या वर्षात वेगाने वाढून ६६ हजार ६०० वर गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांची एचआयव्ही चाचणी केल्यानंतर त्यातील तब्बल ७ हजारांहून अधिक जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांमध्ये एचआयव्ही जनजागृती कार्यक्रम मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी व समुपदेशन शिबिरांचे आयोजन अनिवार्य केले आहे. असे असले तरी कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय कोणतीही चाचणी किंवा तपासणी केली जाणार नाही. विशेषत:, जागरूकता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना क्यूआर कोड स्कॅन करून पुरेशी माहिती मिळवण्यासाठी मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.