

बेंगलुरू : पुढारी ऑनलाईन
बेंगलुरू मध्ये ४ एप्रिल रोजी दोन मुलींसोबत छेडछाडीची घटना घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली होती. एक युवक दोन मुलींजवळ येतो आणि त्यातील एका मुलीला पकडून भिंतीकडे ढकलून देतो आणि तेथून पळून जातो. या घटनेवर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांना विचारणा केली असता त्यांनी अशी काही प्रतिक्रिया दिली की, ज्यामुळे आता गोंधळ निर्माण झाला आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना या प्रकरणी जेंव्हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, यासारख्या घटना मोठ्या शहरांमध्ये होत असतात. जी कायदेशीर कारवाई असेल ती कायद्यानुसार केली जाईल. मी पोलिस अधिकाऱ्यांना पेट्रोलिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या या विधानावर कर्नाटकमध्ये टीका केली जात आहे. लोकांकडून मंत्र्यांकडून या प्रकरणाला हलक्यात घेतले जात असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
या घटनेवरून भाजपने सिद्धरामय्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षाने म्हंटलंय की, या व्हायरल झालेल्या व्हिडिओने शहरातील कायदा सुव्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. बेंगलुरू हे महिलांसाठी असुरक्षित होत असल्याची टीका करण्यात येत आहे.
ही घटना भारती लेआउट मध्ये ४ एप्रिल रोजी रात्री १:५२ च्या सुमारास घडली. या घटनेनंतर घाबरलेल्या दोन्ही मुली ओरडताना रडताना दिसत आहेत. थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यात असे स्पष्टपणे दिसून येते की, एक अज्ञात व्यक्ती मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी घटनेनंतर तेथून पळून जातो. ही एक अरूंद गल्ली असून, आजुबाजूला दुचाकी उभ्या असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती पाठीमागून येऊन मुलींना स्पर्श करत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींना लवकरात लवकर पकडले जाईल असे बेंगलुरू पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पीडित मुलीने या विषयी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
गेल्या वर्षी समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये बेंगलुरूमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये, पोलिसांनी सुमारे ३,२६० गुन्हे नोंदवले, त्यापैकी १,१३५ गुन्हे विनयभंगाचे होते.