Karnataka drowning tragedy: कुटुंबातील 10 जणांचा बुडून मृत्यू

भटकळजवळच्या नदीत अचानक पाणी वाढल्याने दुर्घटना; शिंपले गोळा करायला गेलेल्या कुटुंबावर घाला
Karnataka drowning tragedy: कुटुंबातील 10 जणांचा बुडून मृत्यू
Published on
Updated on

कारवार : नदीतील शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार कुटुंबावर रविवारी अचानक वाढलेल्या पाण्याने घाला घातला. वाढलेल्या पाण्यात बुडून सात महिलांसह दहाजणांचा मृत्यू झाला आहे, तर चौघांना वाचवण्यात यश आले आहे. कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात थट्टेहक्कल गावजवळ वेंकटपुरा नदीत रविवारी ही दुर्घटना घडली. दुर्घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

उमेश नायक (वय 30), लक्ष्मी महादेव नायक (42), लक्ष्मी नायक (30), लक्ष्मी अन्नप्पा नायक 60), लक्ष्मी शिवराम नायक (49), ज्योती नागप्पा नायक (34), मालती नायक (34), मास्तम्मा नायक (38) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण भटकळ येथील शिराली गावचे रहिवासी होते.

घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नायक कुटुंबातील 14 जण थट्टेहक्कल नदीत रविवारी शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. शिंपले गोळा करत असताना एकमेकांचा हात धरून चालत होते. मात्र, शनिवारी रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. शिवाय, समुद्राच्या भरतीमुळे नदीचा प्रवाह संथ होऊन पाण्याची पाण्याची पातळी वाढली.

तथापि, वाढीव पाण्याच्या अंदाज न आल्याने नायक कुटुंबीय वेळीच नदीतून बाहेर आले नाहीत. त्यामुळे १४ जणही बुडाले होते. पैकी चौघांना वाचवण्यात यश आले. यामध्ये नागरत्ना व महादेवी यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. त्यांना उपचारांसाठी मणिपालला नेण्यात आले. महिलांना पोहता येत नसल्याने बहुतांशी महिला बुडाल्या. समजलेल्या नावांनुसार दहा मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. तर दोन मृतांची नावे समजलेली नाहीत. दुर्घटनेची माहिती मिळताच भटकळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याआधीच स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बचावकार्य सुरू होते.

पुनरावृत्ती टाळण्यासाठी हवेत उपाय

दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे.

दुर्घटना नेमकी कशी?

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या प्रवाहाबरोबर नायक कुटुंबातील दोघे जण वाहून जाऊ लागले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना इतर आठजणही बुडाले. मृतदेह भटकळ तालुका शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. शल्यचिकित्सेनंतर ते त्यांच्या शिराली गावी नेले जाणार आहेत. जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार शिवराम हेब्बार यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांना दुःख; मदत जाहीर

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भटकळ येथील थट्टेहक्कल समुद्रकिनाऱ्यावर शिंपले गोळा करत असताना एकाच कुटुंबातील १० जण पाण्यात बुडून मरण पावल्याची बातमी ऐकून दुःख व्यक्त केले असून, ही एक अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना दुःख

दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शिवाय पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख, तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

पोट भरणारे शिंपलेच...

स्थानिक भाषेत कप्पेचिप्पा म्हणून ओळखले जाणारे शिंपले हा माशांचा प्रकार असून, ते खाल्ले जातात. ते काढण्यासाठी लोक बोटीने नदी आणि समुद्रात जातात. पाण्याची पातळी कमी असताना ते काढले जाते. नेहमीप्रमाणे नायक कुटुंबीय पाणी कमी असताना नदीत उतरले होते. मात्र, अचानक पाणी वाढल्याने पोट भरण्यासाठी गेलेल्या या कुटुंबातील १० जणांवर जीव गमावण्याची वेळ आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news