

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील परिसराला किळसवाणे स्वरूप प्राप्त झाले होते. वारांगना आणि तृतीयपंथीयांच्या अश्लील आणि विभत्स हावभावांमुळे सर्वसामान्य नागरिक विशेषत: बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या गृहिणींना या प्रकारांचा त्रास सहन करावा लागत असे. मात्र कल्याण परिमंडळ 3 च्या उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अतुल झेंडे यांनी गुंड-गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढले आहे. या कारवाईत तीन महिला शेठाणींसह दलालास कोठडीचा रस्ता दाखविला तर आहेच, शिवाय या दलदलीतून 13 पिडीत तरूणींची सुटका करवून त्यांची रवानगी सुधारगृहात केली आहे.
मर्जिना जॅनल मंडळ (40, रा. कामतघर, भिवंडी), विमलेश उर्फ पिंकी मुन्नालाल गुप्ता (40, रा. सुरेश काका पावशे चाळ, विठ्ठलवाडी), सरस्वती पुरनचंद्र पांडे (46, रा. वझे कॅम्प, मानपाडा, ता. कल्याण) आणि दलाल प्रशांत विरकुमार गायकवाड (19, रा. वझे कॅम्प, मानपाडा, ता. कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत होत्या. अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी स्वतंत्र पथक तयार केले. गुरूवारी या पथकाने रेल्वे स्टेशन परीसरात भिंवडी बस स्टॉपच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत असलेल्या अड्ड्यावर अचानक धाड टाकली. या कारवाईत 13 तरूणींना ताब्यात घेऊन तीन महिला शेठाणींसह एका दलालास जागीच अटक केली.
एकीकडे या चौकडीच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल कल्याणकरांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह कारवाई करणाऱ्या सर्व पोलिसांचे कौतुक केले. या कारवाईत सातत्य ठेवावे, अशीही मागणी कल्याणकारांकडून करण्यात येत आहे.