नवी दिल्ली : डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर संजीव खन्ना देशाचे ५१ वे सरन्यायाधीश बनणार आहेत. सोमवारी (११ नोव्हेंबर) रोजी ते सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. संजीव खन्ना यांचा वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ २ वर्षांचा होता. नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिने असेल. १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होतील.
संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढे न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून वकिलीला सुरूवात केली. त्यानंतर ते आयकर विभाग आणि दिल्ली सरकारच्या नागरी प्रकरणांचे वकीलही होते. २००५ साली संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. तब्बल १३ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिल्यानंतर खन्ना यांना २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. त्यांच्या या नियुक्तीला त्यावेळी विरोधही झाला होता.
सर्वोच्च न्यायालयातील ६ वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी ४०० पेक्षा अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले. या वर्षी जुलैमध्ये न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्लीचे तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे समर्थनही त्यांनी केले होते. आतापर्यंत परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालयातील अनुभवाच्या आधारे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश बनतात.