पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या कंपनीसाठी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात 'मोफत' जमीन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षांच्या आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. तथापि, ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे विधानसभेत म्हटले आहे.
मुरलीधरन याची सिलोन बेव्हरेजेस ही कंपनी आहे. ही कंपनी कठुआ येथे १,६०० कोटी रुपयांच्या बॉटलिंग प्लांट उभारत आहे. यासाठी २५.७५ एकर जमीन मोफत देण्यात आल्याची माहिती समोर आली. यावर शनिवारी (दि.८) अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तर तासादरम्यान काँग्रेस आणि सीपीआय(एम) च्या आमदारांनी चिंता व्यक्त केल्या. माकपचे आमदार एम.वाय. तारिगामी यांनी मोफत जमीन वाटप करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या प्रकरणी राज्य सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तर काँग्रेसचे आमदार जी.ए. मीर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले. भारतीय नागरिक नसणार्याला एक पैसाही खर्च न करता जमीन कशी दिली गेली, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विरोधी पक्षाच्या आमदारांच्या प्रश्नावर कृषी उत्पादन मंत्री जावेद अहमद दार म्हणाले, की "हा महसूल विभागाशी संबंधित विषय आहे. आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. या प्रकरणी आम्ही वस्तुस्थिती जाणून तपासणी करू."