

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
दाटीवाटीची वस्ती, एक गाडी जाईल एवढीच चिंचोळी वाट. त्यातच फेरिवाल्यांची गर्दी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य. हे चित्र आहे राजधानी नवी दिल्ली जवळच्या गाझियाबाद या शहरातल्या बेहरामपुराचे आणि याच वस्तीमध्ये ‘जिवा हॉस्पिटल’ नावाचे ३० खाटांचे रुग्णालय गरिबांसाठी सेवा देत आहे आणि ते चालवतात डॉ. अजित बाळासाहेब थोरात.
पुण्याजवळच्या शिरुरमधला सामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा रशियातून एमबीबीएसचे शिक्षण घेतो आणि नवी दिल्लीतल्या एम्समध्ये पुढचे धडे गिरवतो. हा अनुभव घेऊन परत गाव गाठण्याऐवजी दिल्लीतच आपले बस्तान बसवण्याचा निर्णय घेतो आणि स्वतःच्या हिंमतीवर २ रुग्णालय सुरू करतो. डॉ. अजित यांची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी तर आहेच मात्र अनंत अडचणींवर मात करणारी देखील आहे. २०२० मध्ये दिल्लीत एका अपघातात अजित यांना वाचवण्यासाठी कुणीच पुढे आले नाही, मोठा रक्तस्राव झाला आणि तब्येत बिघडली. पण डॉ. अजित यांनी त्यावर मात करत हिंमतीनं कमबॅक केले आणि ज्या शहरात आपल्याला मदत मिळाली नाही तिथेच लोकांच्या मदतीचीसाठी उभे राहाण्याचे त्यांनी ठरवले.
आजघडीला राजधानी नवी दिल्लीतल प्रत्येक महत्त्वाचे नाव डॉ. अजित यांच्याशी जोडले गेले आहे. ३२ वर्षीय तरुण डॉक्टर अजित थोरात यांची नवी दिल्ली आणि परिसरात 'जिवा' नावाची २ रुग्णालये आहेत. 'जीव वाचवणे' या शब्दांच्या आद्याक्षरांवून त्यांनी हे नाव त्यांच्या रुग्णालयाला दिले. रशियामधून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर डॉ.अजित यांनी दिल्लीतील एम्समध्ये साडेतीन वर्षे डॉक्टर म्हणून सेवा दिली. यात कोरोना महामारीचाही कठीण काळ होता. दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवेसंबंधी फेलोशिप देखील मिळवली असून लवकरच ती पूर्ण होईल, यामध्ये अनेक उपचार प्रणालींचा अभ्यास आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्तम सेवा देत असताना व्यवस्थापन हेही क्षेत्र आवडीचे असल्याने आपले एक रुग्णालय हवे, ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी आपल्या 'जिवा हॉस्पिटल'ची स्थापना केली. यामध्ये नियमित रुग्णांसह वेगवेगळ्या आजारांसाठी तज्ञ डॉक्टर २४ तास त्यांच्या रुग्णालयात उपलब्ध असतात.
डॉ. अजित थोरात यांच्या रुग्णालयात मूत्रखडा, अपेंडिक्स, पोटाचे विकार, गर्भाशयासंबंधी शस्त्रक्रिया, हाडांच्या विविध शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या आपत्कालीन शस्त्रक्रिया, चरबीच्या गाठीच्या शस्त्रक्रिया अशा अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जातात. आयुष्यमान भारत या योजनेद्वारेही रुग्णांना सुविधा दिली जाते. गर्भवती महिला, गरीब आणि गरजू रुग्ण यांनाही परवडणाऱ्या दरात चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या जातात. रोज येणाऱ्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांसह कामगार, हातावर पोट असलेली अनेक लोक असतात. डॉ. थोरात दवाखान्याच्या अवतीभवतीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देतात. दर रविवारी केवळ ५० रुपयात रुग्णांना तपासणी आणि औषधांची सुविधा उपलब्ध असते. यासह विविध निमित्ताने ते दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असतात.
दिल्लीत अनेक मोठी रुग्णालये असली तरी आणखी वैद्यकीय सेवेची गरज आहे, हे ओळखले होते. शिवाय इथे काम केल्यामुळे अनेक डॉक्टर लोकांची ओळख होती. सोबत शिकलेले अनेक मित्र तज्ञ डॉक्टर आहेत. सेवेदरम्यान माझा अनेक मराठी कुटुंबांशीही संपर्क आला, तेही आता नियमित स्वरूपात आमच्या रुग्णालयात येतात. पुढे महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही अन्य भागामध्येही 'जिवा हॉस्पिटल'चा विस्तार करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. परवडणाऱ्या दरात चांगली आरोग्य सेवा देणे हा माझा उद्देश आहे. यामध्ये पत्नी डॉ. भक्ती थोरात, माझे कुटूंबीय नितीन आणि दौलत थोरात, सहकारी डॉक्टर्स डॉ. गौरव बहिरे, डॉ. विरम लुनिया, डॉ. सुमेध सदनशिव, डॉ. ओंकार काळे, डॉ. निशिंगध गोडसे, वैभव पवार, आरती शिंदे यांचीही मौल्यवान सोबत आहे.
- डॉ. अजित थोरात, संचालक, जिवा हॉस्पिटल