

पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील कुख्यात गँगस्टर अमन साव पोलीस चकमकीत ठार झाला आहे. खून प्रकरणात अटकेत असलेल्या अमनला पोलीस रायपूरहून रांचीला आणत असताना पलामू जिल्ह्यात चकमक झाल्याचे वृत्त आहे.
झारखंडमधील कुख्यात गँगस्टर अशी अमन सावची गुन्हेगारी क्षेत्रात ओळख होती. रांचीतील बरियातू येथे कोळसा व्यावसायिकावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो रायपूर तुरुंगात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हजारीबागमधील 'एनटीपीसी'च्या डीजीएमच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी अमन साहू याला रांची येथे आणले जात होते. चैनपूर आणि रामगड पोलिस ठाण्यादरम्यान असलेल्या अंधारी धोधा येथे अमन साव टोळीतील गुंडांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला. यादरम्यान पोलिसांच्या गाडीला अपघात झाला.
अपघातानंतर अमनने पोलिसांचे शस्त्र हिसकावून घेतले. तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने गोळीबार सुरू केला. पोलिस पथकानेही दिलेल्या प्रत्युत्तरात अमन जागीच ठार झाला. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पलामू पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अमन सावविरुद्ध डझनभर गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अमन साव याने काही काळ मोबाईल दुकान सुरु केले होते. या काळात, तो काही गुन्हेगारांच्या संपर्कात आला. वयाच्या १७ व्या गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या अमनववर ५० हून अधिक गुन्हे दाखल होते. त्याच्या टोळीचे नेटवर्क झारखंडमधील धनबाद, रांची, रामगड, चतरा, हजारीबाग, पलामू, लातेहार आणि बोकारो अशा विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेले होते. कोळसा खाण कंपन्या, कोळसा व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांकडून ही टोळी खंडणी घेत होता. त्याला २०१९ मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. पण, २९ सप्टेंबर २०१९ रोजी पोलिसांना गुंगारा देवून तो पसार झाला होता. जुलै २०२२ मध्ये पोलिसांनी त्याला ३ वर्षांनी पुन्हा अटक केली होती. अमन साव टोळीकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत.
९ मे २०२३ रोजी एनटीपीसी कोळसा प्रकल्पाची आउटसोर्स कंपनी 'ऋत्विक' चे प्रकल्प समन्वयक शरद कुमार यांच्या हत्या प्रकरणी अमन साहूचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय होता. शरद कुमार यांना ६० कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती. ते पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. अमन साववर गिरिडीह तुरुंगाच्या जेलरवर गोळीबार केल्याचाही आरोप होता.