पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधासनभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या आघाडीला बहुमत मिळाले. मुख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांनी शपथही घेतली. आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगावल्या आहेत. झामुमोचे नेते मनोज पांडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला चांगल्या जागा मिळाल्याने मंत्रिमंडळासाठी नवा 'फॉर्म्यूला' काँग्रेससाठी नुकसानकारक ठरणार आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज पांडे म्हणाले की, आम्ही झारखंडमध्ये संतुलित मंत्रिमंडळ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या वाढणार आहे. याबाबत एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय होईल. सर्वच घटकांना प्रतिनिधित्व कसे द्यायचे याचा विचार करत आहोत. पाच आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत आमच्या मंत्र्यांची संख्या वाढेल. मंत्रिमंडळाला अंतिम रूप देण्याचा हा एक आदर्श मार्ग असेल, परंतु तो उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा निर्णय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला लक्षणीय यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ४३ जागा लढवल्या आणि ३४ जिंकल्या. तर काँग्रेसला १६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता नवीन मंत्रिमंडळात पाच आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. हा फॉर्म्युल्या निश्चित झाल्यास काँग्रेसला मिळणारी मंत्रीपदे कमी होणार आहेत.