पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज (दि.२) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष (JMM) ४३, काँग्रेस ३० आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. डावे पक्ष निरसा, सिंद्री आणि बगोदर या तीन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवतील. धनवार, चत्रपूर आणि विश्रामपूर विधानसभा जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांमध्ये जागा वाटपाच्या सूत्रानुसार मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
इंडिया आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद आणि सीपीआय-एमएल हे मित्रपक्ष झारखंडची निवडणूक संयुक्तपणे लढवत आहेत. छतरपूर, बिश्रामपूर आणि धनवर या तीन जागा वगळता इंडिया आघाडीमधील सर्व मतदारसंघांसाठी जागावाटप निश्चित झालेआहे. झामुमोने धनवार जागेवर सीपीआय-एमएल सोबत मैत्रीपूर्ण लढत देणार आहे, असे 'झामुमो'चे सरचिटणीस विनोद पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
झारखंडमधील ८१ सदस्यीय विधानसभेची निवडणूक 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. 'झामुमो'ने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर केली आहे. हेमंत सोरेन यांनी यापूर्वी सांगितले होते की, आगामी विधानसभा निवडणुका इंडिया आघाडी एकत्र लढेल. झामुमो आणि काँग्रेस 81 पैकी 70 जागांवर निवडणूक लढवतील. आता हे दोन्ही पक्ष ७३ जागांवर निवडणूक लढविणार आहेत.
"पंतप्रधान आणि गृहमंत्री झारखंडला येत आहेत. मी त्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की झारखंडवासियांची 1.36 लाख कोटी रुपयांची थकबाकी (कोळसा थकबाकी) भरावी. ही रक्कम झारखंडसाठी महत्त्वपूर्ण आहे," सोरेन यांनी X वर पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी भाजप खासदारांना ही रक्कम मंजूर करण्याची सुविधा देण्याचे आवाहन केले. "मी माझ्या भाजप सहकाऱ्यांना, विशेषत: खासदारांनाही आवाहन करेन की, झारखंडवासीयांना आमची देणी मिळवून देण्यासाठी मदत करावी."