

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी १५ जिल्ह्यांतील ४३ जागांवर शांततेत मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत झारखंडमध्ये ६४.८६ टक्के मतदानाची नोंद झाली, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली.
वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये आणि १० राज्यांतील ३१ विधानसभा मतदारसंघांमध्येही बुधवारी मतदान झाले. यामध्ये राजस्थान ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, कर्नाटक ३, मध्य प्रदेश २, गुजरात १, छत्तीसगडच्या १, मेघालय १, केरळच्या १ मतदारसंघामध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले आहे. वायनाडमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.७९ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली, असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या सर्व निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गढवा जिल्ह्यातील बुधा पहाड भागातही मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूर आणि जगनाथपूर विधानसभा मतदारसंघात, नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी धमक्या दिल्या होत्य़ा. मतदानावर बहिष्कार टाका अशा आशयाचे बॅनर्स आणि पोस्टर्सही लावले होते, तरीही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे आयोगाने सांगितले.
१. चत्रा- ६३.२६ टक्के , २. पूर्व सिंहभूम- ६४.८७ टक्के, ३. गढवा – ६७.३५ टक्के, ४. गुमला- ६९.०१ टक्के, ५. , हजारीबाग ५९.१३ टक्के, ६. खुंटी – ६८.३६ टक्के, ७. कोडर्मा- ६२ टक्के , ८. लातेहार – ६७.१६ टक्के, ९. लोहरदगा – ७३.२१ टक्के, १०. पलामू ६२.६२ टक्के, ११. रामगढ ६६.३२ टक्के, १२. रांची – ६०.४९ टक्के, १३. सराईकेला-खरसावन ७२.१९ टक्के, १४. सिमडेगा ६८.६६ टक्के, १५. पश्चिम सिंहभूम ६६.८७ टक्के