पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये शुक्रवारी (दि.15) आग लागली. या भीषण आगीमध्ये नवजात 10 मुलांचा होरपळून मृत्यू झाला. तर 16 बालके गंभीर जखमी झाली आहेत त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार नवजात अतिदक्षता विभागामध्ये असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मशीनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधीक्षक सचिन माहोर यांनी वृत्तसंस्था 'एएनआय' सोबत बोलताना दिली आहे. या रुग्णालयामध्ये 54 बालके उपचारासाठी दाखल करण्यात आली होती. हा अपघात झाल्याचे समजताच आगीमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावू लागले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 37 मुलांना सुखरूप बाहेर काढले. असे झाशीचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले आहे तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. (Jhansi Medical College Fire tragedy )
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचे वर्णन "हृदय पिळवटून टाकणारे" असे केले आहे. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले. त्यांनी लिहिले आहे की मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांच्याकडून १२ तासांत सविस्तर अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन शर्मा रात्री उशिरा झाशीला रवाना झाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (दि.16) झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मदत जाहीर केली. यामध्ये मृत नवजात बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यूपी सरकारनेही मुख्यमंत्री मदत निधीतून जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये लागलेल्या आग दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना रिलिफ फंडातून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलजेच्या नवजात अतिदक्षता विभागाला आग लागली. या कॉलेजचे फेब्रुवारीमध्ये फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री पाठक यांनी सांगितले आहे. याच बरोबर जूनमध्ये एक मॉक ड्रिलही करण्यात आले होते. ही घटना कशी घडली आणि का घडली, आम्ही चौकशी अहवाल आल्यानंतरच याबद्दल काही सांगू शकतो. अशी माहिती उपमुख्यमंत्री पाठक यांनी दिली.
सोशल मीडियावर या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना ब्रिजेश पाठक म्हणाले की, "झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात अतिदक्षता वॉर्डमध्ये आगीच्या दुर्दैवी घटनेत अनेक नवजात बालकांचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे." त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री म्हणाले की, ते स्वत: अपघातस्थळी पोहोचत असून मदतकार्यावर लक्ष ठेवणार आहेत.
प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट हे अपघाताचे कारण मानले जात आहे. एसएसपी म्हणाले, "आग कोणत्या परिस्थितीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे लागली याचा सविस्तर तपास केला जात आहे." अपघातानंतर काही पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या मुलांची प्रकृती तपासली जात आहे. मेडिकल कॉलेजने सांगितले की, अपघाताच्या वेळी 52 ते 54 मुलांना एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आणि 16 जणांवर उपचार सुरू आहेत. 1968 मध्ये सुरू झालेले हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुंदेलखंड प्रदेशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. या घटनेनंतर एनआयसीयूमधील बचावकार्य रात्री एक वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. या घटनेशी संबंधित सर्व तथ्ये तपासल्यानंतर अहवाल सार्वजनिक केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रजेश पाठक म्हणाले की, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक परिस्थितीत घटनेचे कारण शोधले जाईल. निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल.
निवेदनात म्हटले आहे की सीएम योगी यांनी आयुक्त बिमल कुमार दुबे आणि उपमहानिरीक्षक (झाशी पोलीस रेंज) कलानिधी नैथानी यांना या प्रकरणाचा 12 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. झाशीचे लोकसभा खासदार अनुराग शर्मा म्हणाले की, या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. यावेळी तो स्टेशनच्या बाहेर असल्याचे सांगितले. घटनेनंतर काही वेळाने सदरचे आमदार रवी शर्मा हेही रुग्णालयात पोहोचले.