

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Result) १० वर्षे सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला. तर २७ वर्षांचा राजकीय दुष्काळ दूर करत भाजपने (BJP) दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपने बहुमतांचा आकडा पार करत ४८ जागा मिळवल्या आहेत. तर आप २२ जागांवर थांबला आहे. या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''लोकशक्ती ही सर्वोपरी आहे! विकास जिंकला, सुशासन जिंकले.'' असे पीएम मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
''भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्लीतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझे वंदन आणि अभिनंदन! तुम्ही दिलेले भरपूर आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.'' असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.
दिल्लीचा चौफेर विकास आणि येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही; ही आमची गारंटी आहे. यासोबतच, आम्ही हेदेखील सुनिश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका राहावी. हा मोठा जनादेश मिळण्यासाठी ज्यांनी दिवसरात्र काम केले त्या माझ्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही आमच्या दिल्लीवासीयांच्या सेवेत अधिक मजबुतीने समर्पित राहू, असेही पुढे पीएम मोदी यांनी नमूद केले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये अडीच दशकांपासून भाजप सत्तेपासून दूर राहिला. भाजपचा सत्तेचा हा दुष्काळ या निवडणुकीत दूर झाला आहे. दिल्ली विधानसभेत दिल्लीतील प्रदूषण, यमुनेचे प्रदूषण, विविध भागांमध्ये कचरा आणि सांडपाण्याचा मुद्दा, पायाभूत सुविधा, वाहतुकीची कोंडी, वाढणाऱ्या झोपड्या, लोकसंख्येनुसार विविध सोयीसुविधांची उपलब्धता हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि भाजपने आम आदमी पक्षाला लक्ष्य केले. शीला दीक्षित यांच्या सरकारच्या काळात दिल्लीचा कसा कायापालट झाला यावर काँग्रेस पक्षाने भर दिला तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशातील गोष्टी कशा बदलल्या? यावर भाजपच्या नेत्यांनी भर दिला.
आम आदमी पक्षाने त्यांच्या आधीच सुरू असलेल्या सर्व योजना सुरू ठेवू, असे आश्वासन दिले. सोबतच महिलांना आर्थिक सहाय्य आणि अन्यही घटकांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर केल्या. तर भाजप आणि काँग्रेसने महिलांना आर्थिक सहाय्य, वीज बील सवलत, युवकांसाठी योजना, आरोग्य विमा योजना अशा योजना जाहीर केल्या. तिन्ही पक्षांनी दिल्लीतील सर्व घटकांना आकर्षित करतील, अशा योजना टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या. (Delhi Assembly Election)