

पुढारी ऑनलाईन : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात गारपीट आणि भूस्खलनामुळे अचानक पूर आला, ज्यामुळे ४० घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीतून १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
उधमपूरचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर सांगितले की, काल (शनिवार) रात्री रामबन परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार गारपीट झाली. तसेच जोरदार वारे आणि पावसामुळे भूस्खलनही झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे आणि दुर्दैवाने यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १०० जणांना वाचवण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांच्या मालमत्तेचे तसेच वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आम्ही उपायुक्त बसीर-उल-हक यांच्या संपर्कात आहोत. जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत पोहोचवण्यात येत आहे. गरज पडल्यास खासदार निधीतूनही मदत करण्यात येईल असे ते म्हणाले. जितेंद्र सिंह यांनी लोकांना घाबरून जाउ नये, संयम ठेवण्याची अपील केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात आज (रविवार) जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कुंड गावाला सर्वात जास्त फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नैसर्गिक आपत्तीतून १०० हून अधिक ग्रामीण लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नाशरीपासून बनिहालपर्यंत जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्ग (NH- 44) वर मोठ्या पावसामुळे आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
धरम कुंड गावात पुरामुळे सुमारे ४० घरांचे नुकसान झाले आहे. धुके आणि पाऊस असूनही, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. वाहतूक विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाऊस अजूनही सुरूच आहे, त्यामुळे रस्ता मोकळा होईपर्यंत आणि हवामान सुधारेपर्यंत प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासकीय पथके परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि मदतकार्य सुरू आहे.