

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.3) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली. एकाच दिवशी काही वेळाच्या अंतराने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. काही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर या दोन्ही भेटीत चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये अमेरिकेने भारतावर लावलेले आयात शुल्क, केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रस्तावित फेरबदल, ऑपरेशन सिंदूरनंतरची परिस्थिती याबद्दल चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर आकारण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ही भेट झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आयात शुल्काला उत्तर देण्यासाठी भारताची रणनीती कशी असेल, यासंदर्भातील माहिती पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात शुल्काची चांगलीच चर्चा आहे. यामुळे भारताला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला उत्तर देण्यासाठी काय तयारी केली आहे, या सगळ्या उपाययोजनांबद्दलही पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना अवगत केल्याचेही समजते.
काही दिवसांपूर्वीच संसदेत दोन्ही सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. या चर्चेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिल्याचे समजते. सोबतच मणिपूरमधील परिस्थिती बाबतही गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींना अवगत केल्याचे समजते. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून खूप कमी कामकाज होऊ शकले. विरोधकांनी पहिल्या दिवसापासून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधील मतदार सुधारणा यादीवर चर्चेची मागणी केली. यापैकी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली असली तरी विरोधक अजूनही बिहारमधील मतदार सुधारणा यादीवरील चर्चेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे हा विषय देखील या भेटीमध्ये चर्चेला गेल्याचे समजते.
५ ऑगस्ट पूर्वी भेट
केंद्र सरकारने आतापर्यंत ५ ऑगस्ट रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. तर जम्मू कश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देखील ५ ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. भाजपप्रणित एनडीए सरकारने आपले महत्वाकांक्षी कार्यक्रम ५ ऑगस्टला केले. त्यामुळे येत्या ५ ऑगस्टला एनडीए सरकार जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेणार का किंवा अन्य कुठला तरी महत्त्वाचा निर्णय घेणार, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर झालेल्या भेटीने चर्चा
२१ जुलै रोजी जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आला. त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या संदर्भात देखील काही पैलू या भेटीला असू शकतात, असेही समजते.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाची विधेयके सरकारद्वारे आणली जाऊ शकतात, त्याची माहिती देण्यासाठी देखील पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असू शकते, असेही अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.