पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू व काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान प्रक्रिया आता संपली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आठ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी आज (दि.५ऑक्टाेबर) सायंकाळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. जाणून घेवूया दोन्ही राज्यांमधील एक्झिट पोलचा कौल.
मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार, हरियाणा विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे दिसते. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला 55-62 जागांवर आघाडी मिळू शकते. भाजपला 18-24 जागांवर तर इतर पक्षांना 2-8 जागांवर समाधान मानावे लागेल. ध्रुव रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला 57 , भाजपला 27 आणि इतर पक्षांना 6 जागा मिळताना दिसत आहेत. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, हरियाणात काँग्रेस 90 पैकी 44-54 जागा जिंकून बहुमत मिळवेल. तर भाजपला १९-२९ जागांवर समाधान मानावे लागले. दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला 0-1, आयएनएलडीला 1-5 आणि इतरांना 4-9 जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज 18 च्या एक्झिट पोलमध्येही हरियाणात काँग्रेस सरकार स्थापन करत असल्याचे दिसून आले आहे. या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 59, भाजपला 21 आणि इतर पक्षांना 10 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आजतक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, जम्मूमधील 43 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला संयुक्तपणे 11-15 जागा, भाजपला 27-31 जागा तरपीडीपीला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला १३ ते १५, भाजपला ३५ ते ४० तर पीडीपीला ४ते ६ तर इतरांना १२ ते १६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. न्यूज-18 च्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजप 28-30, नॅशनल कॉन्फरन्स 28-30, काँग्रेस 3-6, पीडीपी 4-7 आणि इतर पक्ष 8-16 जागा जिंकू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 23-27 जागा, काँग्रेस-एनसी आघाडीला 46-50 जागा, इतरांना 4-6 जागा आणि पीडीपीला 7-11 जागा मिळू शकतात, असे अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इंडिया टुडे-सीव्होटर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला जम्मू प्रदेशात ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर विरोधी पक्षाच्या इंडिया ब्लॉकला (नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि इतरांसह) ३६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा विर्षानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यावेळी राज्यात तीन टप्प्यांत मतदान झाले. १ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांवर शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. याआधी 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. राज्याला विशेषाधिकार बहाल करणारे कलम ३७० हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. हरियाणात आज (दि. ५ ऑक्टोबर) एकाच टप्प्यात सर्व ९० जागांसाठी मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये मागील विधानसभा निवडणुका २०१४ मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. २८ जागा जिंकत पीडीपी सर्वात मोठा पक्ष ठरला, तर 25 जागांसह भाजप दुसऱ्या क्रमाकांवर राहिला. नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागांवर समाधान मानावं लागलं होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपने 1 मार्च 2015 रोजी सरकार स्थापन केलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा असून, बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे.
एक्झिट पोलमध्ये मतदानानंतर मतदारांना अनेक प्रश्न विचारले जातात. यामध्ये कोणाला मतदान केले, या प्रश्नाचाही समावेश असतो. हे सर्वेक्षण मतदानाच्या दिवशीच होते. सर्वेक्षण संस्थांचे पथक मतदान केंद्राबाहेर मतदारांना प्रश्न विचारतात. त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्याच्या आधारे निवडणूक निकालांचा अंदाज लावला जातो.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत २०१९ विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपने ९० पैकी ४० जागांवर बाजी मारली तरीही बहुमतासाठी सहा जागा कमी होत्या. काँग्रेस 31 जागा जिंकून विरोधी पक्षात राहिली. जननायक जनता पक्ष हा १० जागा जिंकत किंग मेकर ठरला. भाजपने जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. जेजेपीच्या पाठिंब्याने राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले. मनोहर लाल मुख्यमंत्री आणि जेजेपी नेते दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले होते. आता हरियाणात भाजप 'हॅट्ट्रिक' नोंदविणार का, याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.