पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. भाजपने ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर तासाभरातच मागे घेऊन सुधारित १५ उमेदवारांची सुधारित यादी आज (दि. २६) जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक सुरू असताना त्यात काही बदल करून पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर केली. याआधी पहिल्या यादीत माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्यासह अनेक नेत्यांची तिकिटे रद्द केली होती. पहिल्या यादीतून दिग्गजांची नावे हटवल्यामुळे पक्षात गोंधळ सुरू झाला होता. (Jammu Kashmir BJP)
४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी १५ जागांवर, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १० जागा आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ विधानसभा जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र, जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे या यादीत समाविष्ट केली नव्हती. (Jammu Kashmir BJP)
जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचाही पक्षाने पहिल्या यादीत समावेश केलेला नाही. राज्यात पहिल्या टप्प्यात २४ विधानसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये २४ जागांवर मतदान होणार आहे.