

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने महिलांसाठी एक स्वतंत्र शाखा सुरू केली आहे. ‘जमात-उल-मोमिनात’ असे तिचे नाव आहे. ऑनलाईन नेटवर्कच्या माध्यमातून ही संघटना भारतातील अनेक भागांमध्ये सक्रिय असून, या संघटनेेचे नेतृत्व ‘जैश’चा म्होरक्या मसूद अझहरची बहीण करीत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मसूदच्या बहिणीचा पती ठार झाला होता.
भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने आपल्या रणनीतीमध्ये एक मोठा बदल केला आहे. सामान्यतः, तरुण आणि किशोरवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांना दहशतवादी बनवणार्या या संघटनेने आता महिलांची भरती सुरू केली आहे. संघटनेने पहिल्यांदाच महिलांसाठी एक स्वतंत्र शाखा स्थापन केली असून, तिचे नाव ‘जमात-उल-मोमिनात’ असे ठेवण्यात आले आहे.
या महिला संघटनेत कमांडरच्या पत्नींशिवाय बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मानसेहरा येथील तळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल महिलांना सामील करून घेतले जात आहे. या निर्णयामुळे ‘जैश’ने महिलांना सशस्त्र जिहाद किंवा लढाईच्या मोहिमांमध्ये सामील न करण्याच्या आपल्या जुन्या नियमात बदल केला आहे.
सूत्रांनुसार, या महिलांचा वापर भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून केला जाईल. ‘जैश’ची ही महिला संघटना ऑनलाईन नेटवर्कद्वारे भारतातील अनेक भागांमध्ये सक्रिय आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतासारख्या भागांचा समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हॉटस्अॅप ग्रुप्स आणि काही मदरशांच्या नेटवर्कद्वारे ही संघटना या ठिकाणी आपली पकड मजबूत करत आहे.
हा निर्णय एका पत्राद्वारे सार्वजनिक करण्यात आला. हे पत्र ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख आणि संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवादी घोषित करण्यात आलेला मौलाना मसूद अझहरच्या नावाने जारी करण्यात आले होते. या पत्रानुसार, या नवीन तुकडीमध्ये भरतीचे काम 8 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातील मरकज उस्मान-ओ-अली येथून सुरू झाले आहे. वृत्तांनुसार, अझहरची बहीण सादिया अझहर या महिला शाखेचे नेतृत्व करणार आहे. सादियाचा पती, युसूफ अझहर, 7 मे रोजी भारतीय लष्कराने केलेल्या ’‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मारला गेला होता.