पुरी जगन्नाथ यात्रेस (Jagannath Rath Yatra 2024) दि. 7 पासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेस देशविदेशातून 15 लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रविवारी मंदिरातून पालखी निघणार आहे. भगवान आपल्या भक्तांचे दर्शन घेणार आहेत. नवयौवन दर्शन, नेत्रोत्सव आणि रथयात्रा हे तिन्ही उत्सव एकाच दिवसात पार पडतील.
53 वर्षांत प्रथमच एकाच दिवसात उत्सव संपन्न होणार
चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी समितीकडून एआयचा वापर
15 लाखांहून अधिक भाविक मुख्य सोहळ्यास येणार
पहाटे दोन वाजता मंगलआरती झाल्यानंतर रथयात्रेस प्रारंभ होणार आहे. याआधी प्रत्येक दिवशी एक उत्सव होत होता. मंदिरात फक्त पुजारी आणि सेवेकर्यांना प्रवेश असेल. सर्वात पुढे बलभद्र यांचा, तर दुसर्या क्रमाकांवर सुभद्रा यांचा रथ असणार आहे. शेवटचा रथ जगन्नाथांचा असेल. तिन्ही रथ 9 रोजी मंदिरात प्रवेश करतील.
भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पालखीच्या मार्गावर दोन्ही बाजूंना पुरेशी मोकळी जागा सोडण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडोअर असेल. ठिकठिकाणी वैद्यकीय केंद्र उभा करण्यात येणार आहे.
संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने शहरासाठी विमा लागू केला आहे. यात्रेदरम्यान दुर्घटना घडल्यास मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे.
ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असल्याने शहरात 40 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचा (एआय) अवलंब करण्यात येणार आहे.
7 ते 17 जुलैदरम्यान हा महोत्सव असेल. त्यामुळे या कालावधीत जगन्नाथ दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक भाविक पुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. या काळात पुजार्यांकडून 119 प्रकारचे विधी पार पाडले जातात.