पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नेहमीच खोटे बोलतात. मात्र आता केवळ राजकीय हेतूने ते इतके खाली घसरले आहेत की, त्यांनी कोट्यवधी लोकांच्या विश्वासघात केला आहे. तिरुपती मंदिरातील प्रसादावरुन खोटे पसरवण्यांच्या निर्लज्ज कृत्याबद्दल नायडूंना कठोर फटकारले पाहिजे. या प्रकरणातील सत्य बाहेर आणले पाहिजे, अशी मागणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चंद्राबाबू नायडू यांनी केलेले तिरुपती मंदिरातील प्रसादाबाबत केलेले सर्व आरोप बेपर्वा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. त्यांच्या आरोपांमुळे कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानम ( टीटीडी) बोर्डाचे "पावित्र्य कलंकित" झाले आहे.
भगवान व्यंकटेश्वराचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी हिंदू भक्त आहेत. आताची परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली गेली नाही, तर या आरोपांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आता संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत आहे. खोटे पसरवण्याच्या निर्लज्ज कृत्याबद्दल नायडूंना कठोर फटकारले पाहिजे आणि सत्य बाहेर आणले पाहिजे. यामुळे कोट्यवधी हिंदू भाविकांच्या मनात नायडूंनी निर्माण केलेली शंका दूर होईल आणि तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) च्या पारदर्शकतेवर विश्वास पुनर्संचयित होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
'टीटीडी' हे एक स्वतंत्र मंडळ आहे. यामध्ये विविध पार्श्वभूमीतील प्रतिष्ठित भक्त आणि इतर केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या इतरांचा समावेश आहे.या बोर्डाचे काही वर्तमान सदस्य देखील भाजपशी संलग्न आहेत. बोर्डाच्या प्रशासनावर देखरेख ठेवण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाकडे आहे. यामध्ये आंध्र प्रदेश राज्य सरकारची फारशी भूमिका नाही. . तेलुगू देसम पार्टीच्या राजवटीच्या मागील कार्यकाळातही अशाच प्रकारचे उपाय केले गेले होते. तुपाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने टँकर नाकारण्यात आल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडली आहेत, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
मंदिरातील प्रसाद वापरल्या जाणार्या तुपाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी व्यापक अनुपालन तपासणी केली जात आहे. कठोर ई-निविदा प्रक्रिया, NABL-मान्यताप्राप्त प्रयोगशाळा चाचण्या आणि कोणत्याही सामग्रीचा वापर करण्यापूर्वी बहु-स्तरीय तपासण्या केल्या जातात. अशा प्रकारची पारदर्शी कार्यपद्धती अस्तित्वात असताना भेसळयुक्त तूप प्रसादासाठी वापरणे अशक्य आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
आंध्र प्रदेशमधील पूर्वीच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने श्री व्यंकटेश्वर मंदिरातील लाडू बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली, असा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी भाजप प्रणित एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला होता. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २० सप्टेंबर रोजी तिरुमला तिरुपती देवस्थानचे (TTD)चे कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव यांनी पत्रकार परिषद घेत, नमुन्यांच्या प्रयोगशाळेत चाचणीत प्राण्यांची चरबी आणि चरबीचे प्रमाण आढळून आले असून, भेसळयुक्त तुपाचा पुरवठा झाल्याचे म्हटलं होतं.