पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स (NC) पक्षाने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. ओमर अब्दुल्ला गांदरबलमधून, तन्वीर सादिक झाडीबलमधून निवडणूक लढवणार आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सने सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. काँग्रेस पक्षासोबत जागावाटप निश्चित केल्यानंतर काही तासांनंतर ही यादी समोर आली होती. पक्षाचे अनंतनागचे माजी खासदार न्यायमूर्ती (निवृत्त) हसनैन मसूदी यांना पंपोरमधून उमेदवार म्हणून नाव देण्यात आले आहे. तर पुलवामा येथून माजी आमदार मोहम्मद खलील बंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनंतनाग पश्चिममधून अब्दुल मजीद लार्मी आणि डोडामधून खालिद नजीब सोहरवर्दी यांना संधी दिली आहे.
राजपोरामधून गुलाम मोही-उद-दीन मीर, झैनपोरामधून शौकत हुसैन गनी, शोपियांमधून शेख मोहम्मद रफी आणि डीएच पोरामधून माजी मंत्री सकीना इट्टू यांच्या नावाची घोषणा केली आहे. भदरवाह येथून मेहबूब इक्बाल यांना उमेदवार म्हणून नाव दिले. 90 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स 51 जागा लढवणार आहे आणि काँग्रेस अनुक्रमे 32 जागांवर निवडणूक लढणार आहे. सीपीआय(एम) आणि जम्मू आणि काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी (जेकेएनपीपी) यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. तर पाच जागांवर ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार आहे.