

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजस्थानातील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या व्यवस्थापकावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), एक महिला कार्यकारी प्रमुख आणि तिचा पती अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 20 डिसेंबर रोजी घडली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीडिता रात्री 9 वाजता पार्टीला पोहोचली. पार्टी रात्री 1.30 पर्यंत चालली आणि उपस्थितांसह पीडिताही मद्यधुंद होती. पार्टीनंतर कारमधून घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडित महिलेला कंपनीच्या महिला कार्यकारी प्रमुखाने कारमध्ये घेतले. प्रवासादरम्यान सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीने एका दुकानातून सिगारेटसारखा दिसणारा पदार्थ खरेदी करण्यासाठी गाडी थांबवली. ते पीडितेलाही दिले. ते सेवन केल्यानंतर ती बेशुद्ध पडली. आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे दुसर्या दिवशी सकाळी पीडितेच्या लक्षात आले.