

नवी दिल्ली : भारताच्या औषध सुरक्षा प्राधिकरणाने सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या दोन औषधांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत सुरक्षा अलर्ट जारी केला. ट्रॅनेक्सॅमिक अॅसिड आणि मेटोक्लोप्रॅमाइड या औषधांशी संबंधित संभाव्य दुष्परिणामांबाबत डॉक्टर आणि रुग्णांना सतर्क राहण्याचा इशारा प्राधिकरणाने दिला.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय औषध सुरक्षा आयोगा (आयपीसी) ने जारी केलेल्या औषध सुरक्षा अलर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. देशातील फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया अंतर्गत ऑगस्ट महिन्यात गोळा केलेल्या प्रतिकूल औषध प्रतिक्रिया अहवालांच्या विश्लेषणानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सामान्यतः शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या रक्तस्रावावर किंवा नाकातून होणाऱ्या रक्तस्रावावर वापरले जाणारे ट्रॅनेक्सॅमिक ॲसिड हे औषध स्वतःच नाकातून रक्तस्त्रावास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे जरी प्राणघातक नसली, तरी गंभीर अस्वस्थता निर्माण करू शकते आणि काही वेळा गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असा इशारा आयपीसीने दिला आहे. या औषधाची २०२२ मध्ये जागतिक बाजारपेठ सुमारे ८० दशलक्ष डॉलर्स इतकी होती. येत्या २०२९ पर्यंत ती १०० दशलक्ष डॉलर्स ओलांडेल, असा अंदाज आहे.
दुसरे औषध मेटोक्लोप्रॅमाइड, जे मळमळ, उलटी आणि छातीतील जळजळ यावर वापरले जाते. त्याचा संबंध टाकीकार्डिया (हृदयाच्या गतीत असामान्य वाढ) सोबत जोडण्यात आला आहे. टाकीकार्डिया जर औषधाच्या कारणाने होत असेल, तर ती स्थिती धोकादायक ठरू शकते आणि उपचार न झाल्यास हृदयविकार किंवा स्ट्रोक यासारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे आयपीसीने म्हटले आहे.
सुरक्षा अलर्टचा उद्देश डॉक्टर आणि रुग्णांना या संभाव्य दुष्परिणामांविषयी माहिती देणे आहे. कोणतेही औषध घेताना त्याच्या परिणामांची बारकाईने नोंद ठेवावी आणि गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आयपीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय नागरिकांमध्ये औषधांच्या वापरासंदर्भात सुरक्षिततेचे अधिक गांभीर्य निर्माण व्हावे, यासाठी हे सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आले आहेत.