

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन यांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मोहिमेत आंतरदेशीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचे भारतातील मुख्य केंद्र उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईमुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत घातक ओपिओइड्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचा पुरवठा करणारी मोठी साखळी खंडित झाली आहे.
'ऑपरेशन मान्सून थंडर' या सांकेतिक नावाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एनसीबीच्या पथकांनी ४ आणि १३ नोव्हेंबर रोजी हैदराबाद, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ या प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. या धडक कारवाईत या रॅकेटशी संबंधित सहा मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, ही टोळी सीमेपलीकडून अमेरिकेतील ग्राहकांना प्रतिबंधित औषधांचा पुरवठा करत होती.
डिजिटल नोंदी आणि जप्त केलेल्या पुराव्यानुसार, या टोळीने जून २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुमारे ३,००० पार्सलद्वारे अंदाजे पाच लाख गोळ्यांची तस्करी केली आहे. तपासादरम्यान एनसीबीने अमेरिकेकडे रवाना होणाऱ्या १,५०० हून अधिक गोळ्यांच्या पार्सलची माहिती अमेरिकन डीईएला दिली. या माहितीच्या आधारे डीईएने तात्काळ कारवाई करत अमेरिकेत दोन मोठे कन्साइनमेंट जप्त केले. तस्करीची कार्यपद्धती अत्यंत हाय-टेक होती. भारतातील ऑपरेटर टेलिग्राम, स्काईप आणि व्हॉट्सॲपसारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर स्वीकारत असत.
त्यानंतर अमेरिकेतील त्यांची शाखा युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस आणि इतर कुरिअर सेवांच्या माध्यमातून ही औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचवत होती. सर्व व्यवहारांचा तपशील गुगल शीट्सवर नोंदवला जात होता. या छाप्यांमध्ये तपास यंत्रणांना ५९,००० हून अधिक ग्राहकांचा प्रचंड मोठा डेटाबेस सापडला आहे. यामध्ये ग्राहकांचे पत्ते, व्यवहारांचा इतिहास, यूएसपीएस ट्रॅकिंग आयडी आणि औषधांच्या प्रकारांची माहिती आहे. अमेरिकेतील खरेदीदार आणि ड्रॉप-शिपर्सवर कारवाई करण्यासाठी हा सर्व डेटा डीईएकडे सोपवण्यात आला आहे.
अंतिम लाभार्थ्याचा शोध सुरू
आर्थिक तपासात असे उघड झाले आहे की, भारतीय ऑपरेटर व्हेन्मो, यूपीआय, क्रिप्टोकरन्सी, थर्ड-पार्टी बँक खाती आणि हवाला नेटवर्कद्वारे पैसे व कमिशन स्वीकारत असत. या पैशांचा अंतिम लाभार्थी कोण आहे, याचा शोध सध्या सुरू आहे. अटक केलेल्या एका आरोपीकडून जप्त केलेल्या डिजिटल फाइल्स आणि औषधांच्या ब्रँडवरून या औषधांची खरेदी अनेक देशांतून होत असल्याचे संकेत मिळाले असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.