

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यावर ‘शीशमहल’वरुन टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या जवळपास १० वर्षांच्या कार्यकाळात राजधानीत पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वत:साठी "शीश महाल" बांधला. याचा हिशोब दिल्लीच्या जनतेला केजरीवालांना द्यावा लागेल, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या ‘सुषमा भवन’ - कर्मचारी महिलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानात वापरल्या जाणाऱ्या महागड्या वस्तू आणि उपकरणांची यादी यावेळी त्यांनी वाचून दाखवली.
केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांनी सरकारी गाडी किंवा बंगला न घेण्याची शपथ घेतली होती आणि नवीन प्रकारचे राजकारण करण्याचे वचन दिले, असे शाह म्हणाले. मात्र, त्यांनी स्वतःसाठी ५० हजार चौरस यार्ड जागेवर पसरलेला "शीश महाल" बांधला, ज्यासाठी ४५ कोटी रुपये खर्च आला, असेही ते म्हणाले.
गृहमंत्र्यांनी सांगितले की दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा तयार करू शकले नाही, परंतु केजरीवाल यांनी आपल्या चार जणांच्या कुटुंबासाठी वॉटर प्लांटवर १४ कोटी रुपये खर्च केले. केजरीवाल यांच्या ताब्यात असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील डिझायनर मार्बलवर ६ कोटींहून अधिक, पडद्यांवर ६ कोटी रुपये, स्वयंचलित दरवाजांवर ७० लाख रुपये, कार्पेटवर ५० लाख रुपये आणि स्मार्ट टीव्हीवर ६४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
अमित शाह म्हणाले की, मी ‘एक्स’वर पोस्ट करुन केजरीवाल यांना सुचवले आहे की, त्यांनी दिल्लीतील लोकांना "शीश महल" चा फेरफटका मारण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून लोक त्यांचे मुख्यमंत्री कोणत्या घरात राहतात ते पाहू शकतील. अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली मद्य धोरण, मोहल्ला क्लिनिक, सीसीटीव्ही आणि बस खरेदी यासह इतर गोष्टींवरुन अमित शाह यांनी आरोप केले.
अमित शाह यांनी भाजपच्या दिवंगत नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांची आठवण काढली. त्यांनी लढाऊ विरोधी नेत्या म्हणून काम केल्याचे शाह म्हणाले. सुषमा स्वराज यांच्या विविध महत्त्वाच्या मंत्रालयांमधील सेवेबद्दल त्यांनी आठवण काढली. परराष्ट्र आणि आरोग्य मंत्रालयातील स्वराज यांचे योगदान भारतीय संसदीय इतिहासात लक्षात ठेवले जाईल, तर केजरीवाल यांचा वारसा भ्रष्टाचार आणि स्वार्थाने कलंकित आहे, असे शाह म्हणाले.