

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी भारतात आलेल्या ब्रिटिश महिलेवर, दिल्लीतील महिपालपूर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी कैलाशला अटक केली असून, त्याच्या मित्रावरही छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला महाराष्ट्र आणि गोव्यात सुट्टीसाठी आली होती. तिने कैलाशला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कैलाशने प्रवास करणे शक्य नसल्याचे सांगत तिला दिल्लीला येण्यास सांगितले. महिलेने मंगळवारी (दि.11) दिल्ली गाठली आणि महिपालपूर येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर तिने कैलाशला बोलावले, जो त्याचा मित्र वसीमसोबत हॉटेलमध्ये पोहोचला. त्या रात्री कैलाशने तिच्यावर बलात्कार केला.
सकाळी पीडित महिलेने वसंत कुंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती दिल्यानंतर ब्रिटिश उच्चायुक्तालयही महिलेच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. संशयित आरोपी कैलाश एका खाजगी कंपनीत काम करतो. महिलेने पोलिसांना सांगितले की, कैलाशला इंग्रजी बोलण्यात अडचण येत होती, त्यामुळे तो गुगल ट्रान्सलेटचा वापर करून तिच्याशी संवाद साधत होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घटनेचा तपास सुरु केला आहे.