

कारवार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा देदीप्यमान वारसा जागवत आणि भारतीय नौदलाची ताकद अधिक मजबूत करत 'आयएनएस मालवण' ही अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे दाखल झाली आहे. कारवार येथील ऐतिहासिक 'आयएनएस कदंब' नौदल तळावर पार पडलेल्या सोहळ्यात ही युद्धनौका देशाला समर्पित करण्यात आली. शिवछत्रपतींशी नाते सांगणाऱ्या मालवण शहराचे नाव लाभलेल्या या युद्धनौकेच्या अधिकृत चिन्हावर शिवरायांच्या 'वाघनखा'ची प्रतिकृती कोरण्यात आली आहे.
भारतीय नौदलाने आपल्या सागरी संरक्षण क्षमतेत मोठी वाढ करत 'आयएनएस मालवण' ही अत्याधुनिक ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. 'कोचिन शिपयार्ड लिमिटेड' द्वारे भारताच्या स्वदेशी जहाजांच्या निर्मिती उपक्रमांतर्गत या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. या युद्धनौकेची लांबी सुमारे ८० मीटर असून तिचे वजन जवळपास १,१०० टन आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि आधुनिक रडार तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. किनारपट्टी तसेच खोल समुद्रात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांचा पाठलाग करणे आणि त्यांचा नायनाट करणे यासाठी ही विशेष रचना करण्यात आली आहे.
मालवणचा गौरव
युद्धनौकेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक सागरी शहर 'मालवण'चे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण आणि सागरी व्यापार नियंत्रित करण्यासाठी बांधलेला प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला मालवण येथेच आहे. हाच ऐतिहासिक वारसा जपताना आयएनएस मालवणच्या अधिकृत बोधचिन्हावर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेले अस्त्र 'वाघनख' कोरण्यात आले आहे.