

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शनिवारी पदयात्रेदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने पाणीसदृश्य शाई फेकल्याची घटना घडली. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि केजरीवालांच्या समर्थकांनी सदर व्यक्तीला पकडून मारहाण केली. सदर हल्ला करणारा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी केला. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन हा आरोप केला.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, केजरीवाल दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरात समर्थकांसह फिरत असताना ही घटना घडली. सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तर या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप ‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांनी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीही करत नाहीत, असा आरोप भारद्वाज यांनी केला.
या घटनेवर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की अरविंद केजरीवाल स्वतःला थप्पड मारतील आणि त्यांच्यावर काही फेकल्याचे दाखवतील. तो व्यक्ती नशेच्या अवस्थेत पकडला गेला. आता काहीच चालत नाही म्हणून ते अशा खेळी करत आहेत, असा आरोप सचदेवा यांनी केला. जो कोणी पकडला जाईल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. सदर व्यक्ती आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सचदेवा म्हणाले.