

नवी दिल्ली : सर्वसामान्य जनतेच्या खिशावरील भार वाढवत देशाचा किरकोळ महागाई दर ऑक्टोबर महिन्यात वाढून ६.०९ टक्क्यांवर (तात्पुरती आकडेवारी) पोहोचला आहे. हा दर भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या ६ टक्क्यांच्या कमाल मर्यादेपेक्षाही जास्त असून, गुरुवारी (दि. १२) जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. किरकोळ महागाई दरातील वाढीचा हा सलग बारावा महिना आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये तो केवळ ०.२५ टक्के होता.
सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईत सलग १२ व्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे. महागाईची आकडेवारी ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळी राहिली आहे. महागाईचा परिणाम ग्रामीण भागात जास्त दिसून येतो. ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागात किरकोळ महागाई दर ६.६३ टक्के राहिला, तर शहरी भागात तो ५.४१ टक्के नोंदवला गेला.
खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या
ऑक्टोबरमध्ये अन्नधान्याच्या महागाई दरातही तेजी होती. सरकारी आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई सप्टेंबरमधील ७.७४ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ऑक्टोबरमध्ये ८.९४ टक्क्यांवर पोहोचली. म्हणजेच एका महिन्यात अन्नधान्याच्या महागाईत १.२० टक्क्याची वाढ झाली.
कांदा, लसूण अन् आले महागले
ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर ५ वस्तूंच्या किमतीत सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली.
कांदा : ११६.२२%
लसूण : ६०.७४%
चांदीचे दागिने : ५२.३९%
आले : ४८.३२%
लिंबू : ४७.३०%